पुणे – करोनामुळे राज्यातील सर्व खासगी रुग्णालयांतील 80 टक्के बेड सरकारी नियंत्रणाखाली आणण्याचा आणि त्यातील कर्मचारी अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा), साथरोग नियंत्रण कायदा व आप्तकालीन व्यवस्थापन कायद्याअंतर्गत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील 100 बेडपेक्षा अधिक बेड असणाऱ्या 60 ते 70 रुग्णालयांच्या प्रमुखांची पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचे अध्यक्षेतखाली बैठक घेण्यात आली. यावेळी दोन शहरांतील मिळून एकूण 12 हजार 451 बेड प्रशासनाच्या अधिपत्याखाली आणण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
पुणे जिल्हयात करोनाचे आतापर्यंत 5 हजार 671 रुग्ण संख्या झाली असून त्यापैकी 2,770 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहे. मेस्मा कायद्याअंर्तगत पुणे शहरात 8 हजार 982 बेड राखीव करण्यात आले आहे. त्यापैकी 459 बेड व्हेंटिलेटर, 860 आयसीयू बेड आणि 1361 ऑक्सिजन पुरवठा करु शकणारे बेडने सुसज्ज आहे.
तर पिंपरी-चिंचवड शहरात 3 हजार 469 बेड राखीव करण्यात आले असून त्यापैकी 182 व्हेंटिलेटर बेड, 596 ऑक्सिजन बेड आणि 73 आयसीयू बेडची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना जे दर निश्चित करुन आले आहे त्यानुसार यापुढील काळात आकारणी करण्यात येणार आहे.