मुंबई : अलिकडच्या काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची भाजपसोबत जवळीक वाढली आहे. यावरून मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांनी भाष्य केले. नेत्यांमध्ये विचाराधारांबाबत मतभेद आहेत. त्यामुळे एकेकाळचा शत्रू हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, अशी कितीतरी उदाहरणे असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. यावेळी त्यांनी शरद पवारांनी संघाच्या कामाबद्दल केलेल्या कौतुकावर प्रतिक्रिया दिली.
उद्धव ठाकरे यांची भूमिका बदलत आहे का? असा सवाल अमृता फडणवीस यांना विचारला असता, नेत्यांमध्ये असणारे मतभेद हे विचारधारांबाबत आहेत. त्यांच्या वैयक्तिक पातळीवर ते मतभेद नाहीत. वैचारिक मतभेद असल्याने राजकारणात एकेकाळचा शत्रू असणारा हा मित्र होतो, मग परत शत्रू होतो, परत मित्र होतो अशी कितीतरी उदाहरणे आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
पुढे बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्या की, देवेंद्र फडणवीस किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सगळे प्रगतीचे राजकारण करतात, असे मला वाटते. जातीय राजकारण आपण आणतो, आपण ते करायला नको. लोकांच्या हातात ही बाब आहे, माध्यमांच्या हातात आहे. अमृता फडणवीस यांनी शरद पवार यांनी संघाच्या कामाच्या केलेल्या कौतुकावरही आपले मत मांडले.
शरद पवार हे दिग्गज नेते आहेत. त्यांचे विश्लेषण खूप चांगले असते. आरएसएस बाबत ते जे बोलले ते चांगलेच विश्लेषण त्यांनी केले. त्याबद्दल मला त्याचा आनंद असल्याचे त्यांनी म्हटले.