पिंपरीत आता फिरत्या बसमधून होणार नागरिकांची करोना चाचणी

पिंपरी – करोनाबाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत व्हावी, यासाठी आता फिरत्या बसमधून नागरिकांची करोना चाचणी घेतली जाणार आहे. या उपक्रमासाठी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टिक या कंपनीने वातानुकूलित आणि वैद्यकीय साहित्यांनी सुसज्ज टेस्टिंग बस मोफत उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, करोना चाचणीसाठी संबंधित कंपनीला महापालिका शुल्क अदा करणार आहे. यासाठी तीन पॅकेजेस सादर केली असून, पहिल्या टप्प्यात 25 हजार नागरिकांची टेस्ट अपेक्षित असून, त्यासाठी एक कोटी खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे, या खर्चाला आजच्या स्थायीच्या सभेत मान्यता देण्यात आली.

शहरात दिवसेंदिवस करोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सध्या शहरात करोनाच्या रुग्णांनी 400 चा आकडा ओलांडला आहे. साथरोगाच्या या आपत्कालीन परिस्थितीत शहरातील नागरिकांना आवश्‍यक मदत करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर करोना रुग्णांचे निदान लवकर व्हावे, यासाठी चिंचवड येथील कृष्णा डायग्नोस्टिक या कंपनीने टेस्टिंग बस प्रस्ताव सादर केला आहे. ही बस संपूर्णत: वातानुकूलित राहणार असून सर्व वैद्यकीय साहित्यांनी सुसज्ज असणार आहे. या बसमध्ये नागरिकांच्या चाचण्या केल्या जाणार असल्याने करोनाबाधितांची संख्या लवकर समजण्यास मदत होणार आहे. सर्दी, खोकला, तापाच्या आजाराचे निदान होऊन त्या रुग्णांचे विलगीकरण करणे शक्‍य होणार आहे.

तसेच सर्व प्रभागांमध्ये ही बस फिरविल्यास जास्तीत जास्त नागरिकांची टेस्ट होऊन या साथीच्या आजाराला आटोक्‍यात आणण्यास मदत होईल. तसेच या टेस्टकरिता त्यांनी तीन पॅकेजस सादर केली आहेत.

त्यामध्ये पहिल्या पॅकेजमध्ये डिजिटल एक्‍स-रे, रक्तदाब, शरीरातील ऑक्‍सिजन प्रमाण, शरीराचे तापमान आणि सीबीसी, सीआरपी या चाचणीसाठी 400 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. दुसऱ्या पॅकेजमध्ये स्क्रिनिंग पॅकेज एक अधिक रॅपिड अँटिबॉडी बेस्ड कोविड-19 टेस्ट साठी एक हजार रुपये शुल्क घेण्यात येणार आहे. तर, तिसऱ्या पॅकेजमध्ये कोविड-19 आरटी – पीसीआर स्वॅब टेस्टसाठी 2500 रुपये आकारले जाणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.