पिंपरी – पिंपरी -चिंचवड शहरामध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज (दि.18) बाधितांच्या संख्येने 68 हजारांचा टप्पा पार केला आहे. गेल्या 24 तासांत नवीन 843 रुग्णांची भर पडली असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 68439 इतकी झाली आहे.
शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत शहरातील 843 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर सलग दोन दिवस शहराबाहेरील एकाही रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही. तसेच गेल्या 24 तासांमध्ये 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 14 व शहराबाहेरील 7 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 68 हजार 439 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेची रुग्णालये व कोविड केअर सेंटरमध्ये 6672 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 1150 रुग्णांचाही समावेश आहे.
आज मयत झालेल्या रुग्णंमध्ये शहरातील भोसरी, काळेवाडी, चिंचवड, आकुर्डी, चिखली, निगडी, सांगवी येथील 14 जणांचा समावेश आहे. तर शहराबाहेरील देहूरोड, मावळ, येरवडा, खेड, भूम, रायगड, जुन्नर येथील 7 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
करोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 862 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 57 हजार 914 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 4017 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यापैकी काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. अद्याप 2062 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.