पारनेरमध्ये नाठाळाच्या माथी काठी तर काही ठिकाणी उठाबाशी

तहसीलदार ज्योती देवरे यांची बाहेर फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

पारनेर,  (प्रतिनिधी) – तालुक्‍यामध्ये प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला तरीही नागरिक किरकोळ कारणांसाठी घराबाहेर पडत असल्याचे दिसून येत आहे तसेच काहीजण कारण नसताना फिरताना आढळून येत आहेत. अशांना तहसीलदार ज्योती देवरे यांनी उठाबशा काढत व नाठाळाच्या माथी हाणू काठी प्रमाणे प्रशासनाकडून काठीचा चोप देत घरी पाठवले.

करोनापासून बचावासाठी नागरिकांना गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जमावबंदीचा आदेश जारी केला आहे. तालुक्‍यात कर्फ्यू असल्याने प्रशासनाने कडक पावले उचलत चौका-चौकात नाकेबंदी केली आहे. असे असताना देखील नागरिक किरकोळ गोष्टींसाठी जीवाची पर्वा न करता बाहेर पडत आहेत. त्यांना प्रशासन लाठीकाठी वापर करून घाबरत आहे. मात्र ऐकले नाही तर मात्र नाठाळाच्या माथी काठी हाणून त्यांना सरळ केले जात आहेत. पोलीस प्रशासन गुन्हे देखील दाखल करत आहे. तसेच तहसीलदार देवरे यांनी काही लोकांना उठाबशा काढायला लावून पुन्हा बाहेर पडू नये असे आवाहन केले. नागरिकांनी करोना संदर्भात काळजी घेणे गरजेचे असून प्रशासनाचा चाललेला खटाटोप हा नागरिकांसाठी आहे. मात्र तरी देखील काही नागरिक अशिक्षित प्रमाणे विनाकारण फिरताना दिसून येत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी प्रशासने तालुक्‍यात ठीकठिकाणी पथके तयार करून नाकाबंदी केली आहे.

पारनेर तालुक्‍यांमध्ये पुणे – मुंबई या ठिकाणावरून अनेक लोंढे खेड्यापाड्यात दाखल झाले आहेत. हे लोक कुठलीही काळजी न घेता सर्रास गावागावात चौकाचौकात वावरताना दिसत आहेत. त्यांना प्रशासनाच्यावतीने घरात थांबण्याचे आवाहन केले. मात्र, तरीदेखील हे लोक बाहेर पडताना दिसून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने यांच्याकडे लक्ष द्यावे, अशी खेड्यापाड्यातील ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.