पाकिस्तानात विश्‍वासदर्शक ठरावाच्या वेळी दोन खासदारांना कोंडले

इस्लामाबाद – पाकिस्तानातील संसदेमध्ये शनिवारी विश्वास ठरावावरील मतदानाच्या वेळी पंतप्रधान इम्रान खान यांच्या बाजूने मतदान करायचा दबाव आणण्यासाठी आपल्या दोन खासदारांना चार तासांसाठी कोंडले गेले होते, असा आरोप पाकिस्तानमध्ये विरोधी पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग – नवाज गटाने केला आहे. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावरील विश्वास दर्शक ठरावावर अनुकूल मतदान व्हावे यासाठी सरकारने गुप्तचर यंत्रणांची मदत घेतली, असा आरोप पक्षाच्या उपाध्यक्षा मरियम नवाझ यांनी पत्रकार परिषदेत केला.

सत्ताधारी पक्षाचे खासदार आपल्या पक्षाच्या संपर्कात होते. संसदेत विश्‍वास दर्शक ठरावावरील मतदानाच्यावेळी गुप्तचर यंत्रणांनी विरोधी पक्षांचे खासदार गायब केले. पंतप्रधान इम्रान खान यांच्यावतीनेच हे कृत्य करण्यात आले होते, असा आरोपही मरियम यांनी केला. पाकिस्तान मुस्लिम लीग, न्वाझ गटाचे सर्वेसर्वा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या कन्या असलेल्या मरियम या सध्या इम्रान खान यांच्याविरोधात विशेष आक्रमक झाल्या आहेत.

सिनेट निवडणुकीत पाकिस्तानचे अर्थमंत्री अब्दुल हफीझ शेख यांचा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पंतप्रधान इम्रान खान यांचा राजीनामा मागितला होता. त्यानंतर इम्रान खान यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इम्रान खान यांनी संसदेत जिंकलेल्या विश्‍वास दर्शक ठरावाला कायदेशीर, घटनात्मक, राजकीय किंवा नैतिक मूल्य नाही, असेही मरियम नवाज म्हणाल्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.