पाकमध्ये “ऑनर किलिंग’च्या दरवर्षी सरासरी 650 घटना
लाहोर – पाकिस्तानमध्ये 20 वर्षांच्या युवतीला जिवंत जाळल्याची घक्कादायक घटना घडली आहे. पंजाब प्रांताची राजधानी लाहोपासून 200 किलोमीटर अंतरावर झांग जिल्ह्यातल्या ग्रह महाराजा भागामध्ये ही घटना घडली.
रजाब अली यांनी दिनांक 26 मे रोजी जब्बार आणि आमिर या मुलांसह आणि काही अन्य कुटुंबीयांसह मिळून आपल्या मुलीला मारहाण केली आणि तिला जिवंत पेटवून दिले, असे तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. ही मुलगी प्रेमविवाह करण्यासाठी घरातून निघून गेली होती. ती परत आल्यावर तिच्या कुटुंबियांनी तिला बांधून ठेवले आणि मारहाण केली. नंतर तिला पेटवून देऊन तिची हत्या केली, असे पोलिसांनी सांगितले.
जखमी अवस्थेत तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृत्यूपूर्वी दिलेला जबाबात तिने आपल्या कुटुंबियांनीच पेटवल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी या मुलीचे वडील, 2 बंधू आणि एका बहिणीला ताब्यात घेतले आहे. या सर्वांना आपल्या कृत्याचा अजिबात पश्चाताप झाला नसून मुलीला शिक्षा मिळायला हवी होती, असे त्यांनी सांगितले.
पाकिस्तानमध्ये गेल्या दशकभरात दरवर्षी सरासरी 650 मुलींची “ऑनर किलींग’मधून हत्या झाल्याचे पाकच्या मानवी हक्क आयोगाने म्हटले आहे.