पाकिस्तानातील “इम्रानराज’ आणि भारत (भाग-३)

प्रा. पोपट नाईकनवरे (राज्यशास्र अभ्यासक)
पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. निवडणूक निकाल आणि पाकिस्तानातील भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान होणार हे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुलं अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालचा पाकिस्तान कसा असेल आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल याचा आढावा घेणारा लेख… 
गेल्या चार वर्षांत पाकिस्तान हा विषय भारताने नगण्य करून टाकला आहे. कॉंग्रेसच्या राजवटीत पाकिस्तानला तीन वेळा भारताकडून हार पत्करावी लागली. तरीही त्याचा पुरता बंदोबस्त झाला नाही. वाजपेयींनीही पाकिस्तानबरोबर मैत्री करायचा प्रयत्न केला पण त्यालाही यश आले नाही. नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यावर पाकिस्तानला कुरवाळण्याचा प्रयत्न केला, पण यश येत नाही म्हटल्यावर पाकिस्तानचे महत्त्वच कमी करण्याचे धोरण मोदी सरकारने आखले. पाकिस्तान करत असलेल्या दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत असतानाच आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या देशाला एकाकी पाडण्याचे धोरण भारताचे आहे. या दुहेरी धोरणात भारताला चांगलेच यश आले आहे.
आज पाकिस्तानातील निवडणुका किंवा तेथील राजकीय घडामोडींबद्दल कोणतीच उत्सुकता भारतीय राजकीय गोटात नाही. याचे कारणही हेच आहे की, तिथे कुणीही सत्तेवर आले तरी दहशतवाद आणि भारतासंबंधीचे त्यांचे धोरण काही बदलणार नाही. आता तर पुढील सरकार हे भारतविरोधीच असल्याचे स्पष्ट होत आहे. पाकिस्तानातील निवडणुकांना नेहमी हिंसाचाराचे गालबोट लागते, याहीवेळी ते लागले आहे. मतदानाच्या दिवशी आणि निकाल जाहीर होतानाही पाकिस्तानात बॉम्बस्फोट होत होते.
पाकिस्तानातील अराजक मिटवण्याच्या दृष्टीने इम्रान खान काही पावले टाकतील अशी शक्‍यता दिसत नाही. भारताविरोधात शस्त्र म्हणून वापरायचा दहशतवाद आता पाकिस्तानच्या बोकांडी बसला आहे. त्याला मानेवरून खाली उतरवण्याचे मोठे आव्हान नव्या राजवटीसमोर आहे. पण पूर्णपणे लष्कराच्या कह्यात असलेल्या इम्रान खान यांना ते जमेल याची खात्री देता येत नाही.
अलीकडील काळात दहशतवादाच्या मुद्यावर पाकिस्तान आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडला आहे. पुढील काळात त्याचे एकाकीपण संपेल अशी चिन्हे नाहीत. चीनचा या देशाला पाठिंबा आहे. पण चीनच्या साथीने पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये होत असलेल्या सीपीइसी प्रकल्पावर स्थानिक लोक नाराज आहेत आणि तो प्रकल्प बंद करावा म्हणून पाकिस्तान सरकारवर दबाव येत आहे. ही परिस्थिती इम्रान खान कशी हाताळतात हे बघावे लागेल. चीनशिवाय कोणताही मित्र नसल्याने त्याच्या सुरात सूर मिसळणे हा एकमेव पर्याय पाकिस्तानकडे आहे. मुळात पाकिस्तानी लष्कराच्या धोरणांची अंमलबजावणी करणे, एवढे एकच काम इम्रान खान करतील असे तज्ज्ञांचे मत आहे.
वास्तविक पाहता इम्रान खान खेळाडू आहेत. पूर्णपणे वेगळी पार्श्‍वभूमी असलेले इम्रान खान पाकिस्तानी राजकारणात बदल घडवून आणू शकतात. पण सध्या त्यांची तशी इच्छाही नाही आणि स्थितीही नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणात एकाकी पडूनही पाकिस्तानला आपल्या दहशतवादी धोरणाचा फेरविचार करण्याची गरज भासत नाही, कारण त्याला फक्त भारताला त्रास द्यायचा आहे. त्यासाठी इम्रान खान लष्कराच्या हातातील बाहुले बनायला तयार आहेत. एक राष्ट्र म्हणून पाकिस्तानला उभे करण्याची गरज तेथील कुणालाच वाटत नाही, ही खरी चिंतेची बाब आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)