पाकिस्तानातील “इम्रानराज’ आणि भारत (भाग-१)

प्रा. पोपट नाईकनवरे
राज्यशास्र अभ्यासक 
पाकिस्तानात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाकडे भारताचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिले होते. निवडणूक निकाल आणि पाकिस्तानातील भूराजकीय परिस्थिती लक्षात घेता इम्रान खान पंतप्रधानपदी विराजमान होणार हे आता स्पष्ट झाले आहे. पाकिस्तानी लष्कराच्या हातातील बाहुलं अशी प्रतिमा असलेल्या इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालचा पाकिस्तान कसा असेल आणि त्याचा भारतावर काय परिणाम होईल याचा आढावा घेणारा लेख…
पाकिस्तानातील घडामोडींचा भारताने स्वत:वर परिणाम करून घेण्याचे दिवस आता संपले आहेत. नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून भारताचे पाकिस्तानबाबतचे धोरण कमालीचे बदलले आहे. पाकिस्तानच्या कारवायांना चोख प्रत्युत्तर देणे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला एकाकी पाडणे हे भारताचे त्या देशाबाबतचे सध्याचे धोरण आहे. पाकिस्तानात निवडणुका होऊन आता सत्तांतर होत आहे, पण तरीही भारताचे त्या देशाबाबतचे धोरण बदलण्याची सुतराम शक्‍यता नाही.
इम्रान खान यांचा पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला आहे. इम्रान खान पंतप्रधान होऊ शकतात, असे जवळपास स्पष्ट झाले आहे. म्हणूनच आता नव्या सरकारच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान कसा असेल आणि भारताबरोबरचे त्याचे संबंध कसे असतील याची उत्सुकता दिसू लागली आहे.
इम्रान खान पंतप्रधान होणार अशी चिन्हे दिसू लागल्यावर कपिलदेव यांच्यासारख्या त्यांच्या समवयस्क क्रिकेटपटूंनी त्यांचे अभिनंदनही करून टाकले. इम्रान खान यांच्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारतील अशी भाबडी आशाही काहींनी व्यकत केली आहे. पण पंतप्रधान झाल्यावर इम्रान खान हे करू शकणार हा खरा प्रश्‍न आहे. पाकिस्तानची आर्थिक स्थिती सावरणे हे नव्या पंतप्रधानांसमोरचे मोठे आव्हान आहे. आर्थिक स्थिती सुधारायची असेल तर त्यासाठी देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था राखणे आणि बाहेरच्या देशांशी सौहार्दपूर्ण आणि आर्थिक व्यवहारांना प्राधान्य देणारे संबंध राखणे हे अत्यंत आवश्‍यक असते. पाकिस्तानच्या कोणत्याही नेत्याकडून आजपर्यंत हे घडलेले नाही. केवळ भारतकेंद्रित राजकारण करणे आणि सत्तेवर येणे हेच धोरण पाकिस्तानच्या राजकीय नेत्यांनी अवलंबिले आहे आणि आता इम्रान खान यांनीही भारताला लक्ष्य करतच सत्तेचा सोपान चढला आहे.
क्रिकेटपटू असताना इम्रान खान यांनी देशातील कॅन्सर रुग्णांसाठी मोठे इस्पितळ बांधले. त्यांची ही समाजसेवा पाकिस्तानीच नाही तर जगभरातील त्यांच्या चाहत्यांना भावली. 1996मध्ये त्यांनी पाकिस्तान तेहरिक इ इन्साफ या पक्षाची स्थापना करून राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी ते आदर्शवादी होते. पाकिस्तानात धार्मिक भेद, आर्थिक भेद नष्ट करून एकसंध असा समाज उभा करायचा होता. पण राजकारणातील 22 वर्षांच्या प्रवासाने त्यांना आदर्शवाद गुंडाळून ठेवणे शहाणपणाचे आहे हे समजले. त्यांनी तेच केले.
इम्रान खान यांच्या राजकीय प्रवासात त्यांना फारसे कुणी गांभीर्याने घेतले नव्हते. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात असलेल्या पीएमएल-एन, पीपीपीसारख्या पक्षांनी तर या पक्षाला कधी आव्हानात्मक मानलेच नाही. इम्रान खान यांच्या पक्षालाही अफगाण-पाकिस्तान सीमेवरील फाटा, पख्तून खैबर वगैरे प्रांतांत जास्त यश मिळत राहिले. या भागात तालिबानचा चांगलाच वरचष्मा आहे.
1996मध्ये पक्षाची स्थापना झाल्यावर इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक ए इन्साफ या पक्षाला पुढच्याच वर्षी म्हणजे 1997 च्या निवडणुकीत जबरदस्त पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत या पक्षाचे केवळ इम्रान खानच निवडून आले. 2007 मध्ये त्यावेळचे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी आणीबाणी जाहीर केली तेव्हा इम्रान खान यांना तुरुंगातही जावे लागले. 2008च्या निवडणुकांवर इम्रान खान यांनी बहिष्कार टाकला होता.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)