लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील झेलम शहरामध्ये एका गर्भवती महिलेवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला बांधून हा अत्याचार केला आहे. या घटनेमुळे पाकिस्तानमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
सदर घटनेनंतर महिलेने स्वत: रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना पाचारण करुन महिलेसोबत घडलेला प्रकाराची माहिती दिली. रुग्णालय प्रशासनाने महिलेची वैद्यकीय तपासणी केली असून रक्ताचे नमुने लाहोरला पाठवले आहेत.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी अगोदर महिलेच्या घरात घुसून तिच्या पतीला मारहाण केली. त्याला बांधून ठेवल्यानंतर महिलेवर अत्याचार केला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी विशेष पथकाची स्थापना केली आहे. तसेच आरोपींना पकडण्यासाठी शोधमोमहीम सुरु करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असल्याची माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.