इटली – करोना विषाणू महासाथीने वर्षभराहून अधिक काळासाठी अवघं जग ठप्प झालं होत. या विषाणूला प्रतिबंध करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करून लस तयार करण्यात आली असून जगभरात लसीकरण मोहीम सुरु आहे. लस घेतल्यानंतर बाधा होत असल्याची काही प्रकरण समोर आली असली तरी ही बाधा अगदीच सौम्य स्वरूपाची असल्याचं दिसतंय. तसेच लस घेतलेल्यांमध्ये बाधा झाल्यास रुग्णालयात दाखल करण्याचे प्रमाण कमी असून मृत्युदर देखील नगण्य आहे. या सर्व कारणांमुळे जगभरातील तज्ज्ञ लस घेण्याचा सल्ला देतायेत. असं असलं तरी काही महाभाग अद्यापही लस घेण्यासाठी समोर येत नसल्याचं दिसतंय.
नागरिकांनी लस घ्यावी यासाठी अनेक देशांतील सरकारांनी लस न घेतलेल्यांना अनेक सुविधांचा लाभ घेता येणार नसल्याचे नियम लागू केले आहेत. अशातच इटली येथील एका व्यक्तीने लस न घेता लसीकरण प्रमाणपत्र मिळावे यासाठी मोठा उपद्याप केल्याची घटना समोर आली आहे.
हा ५० वर्षीय इसम करोना प्रतिबंधक लस न घेताच त्याचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी लसीकरण केंद्रावर चक्क नकली हात बसवून आला होता. यावेळी परिचारिकेला लस देण्याआधी दंडाला लावण्यात येणार द्रव लावत असताना त्वचा प्रमाणापेक्षा अधिक मऊ व थंड असल्याचं जाणवलं. यामुळे संशय आल्याने परिचारिकेने याबाबत विचारणा केली असता या इसमाने दंडावर सिलिकॉन लावून नकली हात तयार केला असल्याचं कबूल केलं.
याबाबतची तक्रार करू नये अशी विनंतीही या व्यक्तीने परिचारिकेला केली. मात्र घटनेचे गांभीर्य लक्षात घेत परिचारिकेने थेट पोलिसांत संपर्क साधून याबाबत माहिती दिली. सदर व्यक्तीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
प्राप्त माहितीनुसार हा व्यक्ती स्वतः आरोग्यकर्मी असून त्याने लस घेतली नसल्याने त्याला निलंबित करण्यात आले होते. नौकरीवर पुन्हा रुजू होता यावे यासाठी या इसमाने हा बनाव रचल्याचं समोर आलंय.
या व्यक्तीने रचलेला बनाव संपूर्ण समाजासाठी घातक असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.