वृद्धत्व अवस्थेत ‘हे’ आहार देतील तुम्हाला तारुण्याची अनुभूती

वृद्धत्व म्हणजेच म्हातारपण, पण हा काही रोग नाही, किंवा तो शापही नाही तर ती एक नैसर्गिक जैविक प्रक्रिया आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून साठ वर्षांनंतर वृद्धावस्था सुरू होते. माणसाचे वय जसजसे वाढत जाते, तसे वाढत्या वयासोबत त्याच्या शारीरिक कार्यामध्ये घट होत जाते. ही घट व्यक्तीला जाणवते तसेच शरीरांतर्गत आणि बाह्य स्वरूपात बदल घडून आणण्यास कारणीभूत ठरते. या बाह्य स्वरूपाच्या शारीरिक बदलावरूनच माणसाचे वय माहीत नसले तरीही त्या माणसाच्या वयाचा अंदाज लावता येतो.

शारीरिक कार्यामध्ये घट होण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील अवयवांची झीज होते. याचा परिणाम ज्ञानेद्रियांवरही झालेला दिसून येतो. म्हणूनच या वयात कमी दिसते, ऐकायला कमी येते, चव आणि गंध यांची जाणीवही जराशी कमीच होते. तसेच व्यक्तीच्या मानसिकतेतही लक्षणीय बदल आढळून येतो.

या अवस्थेत माणूस स्वत:चाच जास्त विचार करतो. अविरत कार्यरत असणाऱ्या शरीरयंत्राची कुरकुर सुरू होते. गुढगेदुखी, थोड्याशा श्रमामुळे थकवा आणि अशक्तपणा याद्वारे व्यक्त होतो.

यामुळे कोणाला आहारात स्वारस्य वाटत नाही तर कोणी आवश्‍यकतेपेक्षा जास्त खातो. या दोहोंचा परिणाम आरोग्यावर होतो. कारण आहार आणि आरोग्य यांचा निकटचा संबंध आहे; किंबहुना आहार ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. म्हणूनच आहाराचे नियोजन व्यवस्थित करायला हवे. आहाराचे नियोजन करताना शारीरिक श्रम आणि शारीरिक अवस्था विचारात घेऊनच करायला हवे. या वयात ऊर्जेची गरज तरुण वयापेक्षा कमी झालेली असते.

मात्र, जीवनसत्वे व खनिजे यांच्या आवश्‍यकतेत फारसा बदल होत नाही म्हणून वृद्ध व्यक्तीचा आहार साधा परंतु सकस आणि पोषक हवा. आहारामध्ये पालेभाज्या आणि फळांचा भरपूर वापर करावा. मोड आलेले धान्य दिवसातून एक वेळ तरी पचेल एवढे घ्यावे.

चमचमीत, मसालेदार व तळलेले पदार्थ खाण्याचे शक्‍यतो टाळावे. तेल, तूप, साखर आणि मीठ यांचा आहारात कमीतकमी प्रमाणात वापर करावा. काकडी, गाजर, टोमॅटो, पानकोबी, बीट अशा प्रकारच्या कच्च्या भाज्या भरपूर घ्याव्यात. पाणी, ताक दही, फळांचा रस या सारखे पातळ पदार्थ दिवसातून जमेल तेवढे घ्यावे.

दोन वेळेस भरपूर जेवण घेण्यापेक्षा तीनचार वेळा थोडे थोडे खावे. सकाळी चहा कॉफीसह थोडा नाष्टा करायला हरकत नाही. नियमितपणे जेवणाची व शौचाला जाण्याची सवय लावावी. उपवास करू नये. रात्रीचे जेवण ताजे असावे. रात्री उशिरा जेवण करू नये. खूप जागरण करू नये. या वयात बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. संतुलित आहार, भरपूर पाणी नियमितपणे जेवणाची वेळ व शौचाला जाण्याची सवय लावावी. पुरेशी झोपही आवश्‍यक असते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

नियमितपणे व्यायाम करण्याची सवय असावी. वृद्ध व्यक्तीसाठी चालणे हा उत्तम आणि सुलभ व्यायाम आहे. सकाळी आणि सायंकाळी किमान अर्धा तास तरी चालण्याचा व्यायाम करावा. एकदा वय झाले की काही जणांचे दात हलून पडतातही. तेव्हा घरात सर्वांसाठी तयार केलेले पदार्थ वृद्ध व्यक्ती खाऊ शकत नाही.

अशावेळी घरातील इतर व्यक्तींनी त्यांच्या आहाराची काळजी घ्यावी. त्यांना सहज खाता येतील, पचतील असे पोषक पदार्थ तयार करावेत. काही म्हातारी माणसे पूर्वीसारखाच आहार घेतात. शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी खर्च होते आणि मग अतिरिक्त ऊर्जा शरीरात चरबीच्या रूपाने साठत जाते. स्थूलपणा हे असाध्य अशा बऱ्याच रोगांचे मूळ आहे.

– वसंत बिवरे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.