जाजपूर : ओडिशामध्ये आज सकाळी एक मोठी दुर्घटना घडली आहे. जाजपूर जिल्ह्यातील कोराई स्थानकावर मालगाडी रेल्वे रुळावरून घसरली. येवढेच नाही तर ही रेल्वे थेट प्रवासी वेटिंग रूममध्ये धडकली असल्याचे सांगण्यात येत आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोराई स्टेशनवर आज पहाटे एक मालगाडी रुळावरून घसरली. त्यानंतर मालगाडीचे डब्बे थेट फलाटावर बांधलेल्या वेटिंग हॉलमध्ये घुसले. यादरम्यान दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, अपघातामुळे दोन रेल्वे मार्ग ब्लॉक झाले आहेत. स्टेशनच्या इमारतीचेही नुकसान झाले आहे. मदत पथके, रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले, बचावकार्य सुरू आहे.
ओडिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी कुटुंबीयांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आणि कोराई मालगाडी रुळावरून घसरलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर केली. त्यांनी प्रशासनाला बचाव कार्याला गती देण्याचे आणि जखमींना पुरेसे उपचार देण्याचे निर्देश दिले आहेत.
आज सकाळी मालगाडी रुळावरून घसरून झालेल्या प्रवाशांच्या मृत्यूबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शोक व्यक्त केला. मंत्र्यांनी पीडितांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. गंभीर जखमींना एक लाख रुपये तर किरकोळ जखमींना २५ हजार रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.