मुंबई – जगातील तिसरा सर्वात मोठा ऑटोमोबाइल बाजार देशात आहे. तसेच देशात प्रभावी आणि स्वस्त औषधे तयार होत आहे. भारताचा विकास दर 6.8 टक्के असून मोदींच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि जागतिक बँक यांनीही भारताची अर्थव्यवस्था स्थिर असल्याचे म्हटले असल्याची पुष्टी त्यांनी दिली.
मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत नड्डा बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियांका गांधी वड्रा यांच्यावर निशाणा साधला. जे. पी. नड्डा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून देशात 53 कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत.
यामुळे देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात विविध योजनांचा लाभ थेट हस्तांतरित केला जात आहे. ग्रामीण भागातील लोकही आज वाहने खरेदी करतात. त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते असे करतील का?, असे म्हणत त्यांनी विरोधकांना टोला लगाविला.
महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत परत आल्यास ब्रेक सरकार स्थापन होईल. काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटबाजीमुळे राज्यातील विकास मंदावेल, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
काँग्रेस समाजात फूट पाडण्याचे काम करत असून राहुल गांधींच्या मोहब्बत की दुकनमध्ये फूट पाडण्याची हत्यारे विकली जातात. लोकसभेतील विरोधीपक्षनेते राहुल गांधी हे देशविरोधी अजेंडा राबवत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता त्यांना धडा शिकवलाच पाहिजे, असेही ते म्हणाले.