मुंबई – देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत. याचा फटका सर्वसामान्यांना रोज बसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १५ दिवसांत तब्बल १३ वेळा वाढल्या आहेत. मात्र, आज ठाणेकरांना ‘एक रुपयात एक लिटर पेट्रोल’ मिळणार आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसून येत आहे.
आता तुम्ही म्हणाल, हे असं कसं शक्य ‘एक रुपयात एक लिटर पेट्रोल’… हो तुम्ही बरोबर विचारलंत. ठाणे शहरात हा उपक्रम शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राबवण्यात आला आहे. दरम्यान, एक रुपयात एक लिटर पेट्रोल मिळत असल्यामुळे पेट्रोल पंपावर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
कापूरबावडी येथील तत्वज्ञान विद्यापीठाजवळील कैलाश पेट्रोल पंपावर सकाळी ११ वाजल्यापासून एक रुपयात एक लिटर पेट्रोल दिलं जात आहे. दरम्यान, सध्या पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. पण अश्यातच या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी ठाणेकरांनी पेट्रोल पंपावर चांगलीच गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.