मध्यप्रदेशात आयकर विभागाच्या कारवाई प्रकरणी सीआरपीएफ-पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक

भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे ओएसडी (ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी) असलेल्या प्रवीण कक्कर यांचे निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या अश्विन शर्मा यांच्या घरावर आज आयकर विभागाने धाड टाकली आहे. आयकर विभागाकडून अश्विन शर्मा यांच्या निवास्थानी धाड टाकल्यानंतर घरामध्ये असणाऱ्या सर्वांना जेरबंद करून ठेवण्यात आले आहे.

आयकर विभागाने केलेल्या या कारवाईची माहिती मिळाल्यानंतर भोपाळ शहराचे एसपी घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी सदर इमारतीच्या बाहेर तैनात असणाऱ्या सीआरपीएफ जवानांना पोलिसांना इमारतीमध्ये प्रवेश करू द्या अशी विनंती केली मात्र सीआरपीएफ जवानांनी त्यांची मागणी मान्य न केल्याने मध्य प्रदेश पोलीस व सीआरपीएफ जवानांमध्ये शाब्दिक चकमक घडून आली.

याबाबत माहिती देताना भोपाळचे पोलीस एसपी भूपिंदर सिंग यांनी सांगितले की, “आम्हाला आयकर विभागाच्या कारवाईशी काहीही देणंघेणं नसून आयकर विभागातर्फे धाड टाकण्यात आलेली इमारत ही अपार्टमेंट असल्याने तिथं अनेक कुटुंब वास्तव्यास आहेत. या इमारतीतील लोक या कारवाईमुळे भयभीत झाले असून त्यांनी पोलिसांशी संपर्क साधल्याने आम्ही येथे दाखल झालो आहोत.”

तर दुसरीकडे सीआरपीएफचे अधिकारी प्रदीप कुमार यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “आम्हाला आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आयकर विभागाची कारवाई सुरु असताना कोणालाही या इमारतीमध्ये प्रवेश करू देऊ नका असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आम्ही केवळ आम्हाला देण्यात आलेल्या आदेशांचे पालन करत आहोत.”

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.