नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील मोरेना जिल्ह्यात विषारी दारु पिल्याने 11 जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सात जणांची प्रकृती गंभीर असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सात जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मोरेनाचे पोलीस अधीक्षक अनुराग सुजानिया यांनी दिली.
मोनेर जिल्ह्यातील दोन गावांमध्ये या घटना घडल्या आहेत. पहावली आणि मनिपूर अशी या गावांची नाव असून, पहावलीतील तीन, तर मनिपूरमध्ये सात लोक मरण पावले आहेत. सात जण सध्या रुग्णालयात उपचार घेत असून, एका व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने तिला ग्वालियरला हलवण्यात आले आहे. विषबाधा झालेली दारू देशी बनावटीची असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दारू प्राशन केलेल्या लोकांना मध्यरात्री उलट्यांचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. यातील दहा जणांचा रस्त्यातच मृत्यू झाल्याचे रुग्णालयात दाखल करताना समोर आले. तर एकाच उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोरेना जिल्हा रुग्णालयात मयताच्या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी मयताच्या कुटुंबीयांनी रुग्णालय परिसरात प्रचंड गोंधळ घातला.
रुग्णवाहिकेतून मृतदेह घेऊन जाण्याचा आग्रह रुग्णालय प्रशासनाकडून नातेवाईकांना करण्यात आला. मात्र, ट्रॅक्टरमधूनच मृतदेह घेऊन जाऊ, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली. त्यावरून गोंधळ झाला. अशा घटना घडल्यानंतर कारवाई करण्यात येते. मात्र, या दारूची विक्री थांबवण्यासाठी का प्रयत्न केले जात नाहीत. पोलिसांसह यात अधिकारी सहभागी असल्याचा आरोप कुटुंबीयांच्या नातेवाईकांकडून यावेळी करण्यात आला.