लोणावळ्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची अरेरावी

कर्मचाऱ्यांना शिवीगाळ : लोणावळा नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

अतिक्रमण कारवाई दरम्यान कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍की

अतिक्रमण कारवाईमध्ये प्रशासनाकडून पक्षपातीपणा – शादान चौधरी
लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने सुरू असलेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप नगरपरिषदेमधील शिवसेना गटनेत्या शादान चौधरी यांनी केला आहे. शहरातील पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या मोठमोठ्या हॉटेल आणि रिसॉर्टच्या अतिक्रमणाकडे डोळेझाक करून हातावर पोट असणाऱ्या स्थानिक गरीब व्यावसायिकांना तसेच काही मोजक्‍या लोकांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही चौधरी यांनी केला आहे.

लोणावळा  –लोणावळा नगरपरिषदची अतिक्रमण विरोधी कारवाई सुरू असताना खंडाळा विभागात शिवसेना पदाधिकारी आणि नगरपरिषद कर्मचारी यांच्या दरम्यान वादविवाद झाला. या वादविवादाचे रूपांतर नगरपरिषद कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धक्‍काबुक्‍कीमध्ये झाल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी सोमवारी नगरपरिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून कामबंद आंदोलन केले.

उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या तज्ज्ञ समितीच्या आदेशानुसार लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने लोणावळा शहरात अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार ही कारवाई सुरू असताना रविवारी दुपारी खंडाळा सनसेट पॉईंट येथे वरील वादावादीचा प्रकार घडला. सनसेट पॉईंट येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या टपऱ्या व शेड काढण्याची कारवाई सुरू असताना मोहन मल्ला या शिवसेना पदाधिकाऱ्यानी त्याठिकाणी जाऊन आपण शिवसेना शाखा प्रमुख असल्याचे सांगून कारवाईला विरोध केला. हा वाद वाढत जाऊन मल्ला याने नगरपरिषदेचे कर्मचारी दत्तात्रय गायकवाड आणि विजय साळवे यांना हात उगारून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याचे तसेच गायकवाड यांना धक्काबुक्की केल्याचे नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान मल्ला यांनी फोन करून बोलावून घेतलेल्या शिवसेना गटनेत्या शादान चौधरी व नगरसेविका सिंधू परदेशी या कारवाईच्या ठिकाणी पोचल्या. शहरातील रामकृष्ण, पिकाडेल यासारख्या मोठ्या हॉटेलची अतिक्रमण का काढीत नाहीत, गरिबांचीच अतिक्रमण का काढता अशी विचारणा करीत महामार्गावर आंदोलन करणार असल्याचे सांगत कारवाईमध्ये अडथळा निर्माण केला, असा आरोप नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी केला. मल्ला आणि नगरसेविका सिंधू परदेशी यांच्या विरोधात जोपर्यंत फौजदारी गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. तसे निवेदन सर्व कर्मचाऱ्यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्याला दिले आहे.

लोणावळ्यात आज निषेध मोर्चा आंदोलन अतिक्रमण विरोधी कारवाई करायचीच असेल तर गरीब, श्रीमंत असा भेद न करता सरसकट सर्वांवर सारखी कारवाई करावी, अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (दि. 4) शिवसेनेसह आरपीआय व लोणावळेकर नागरिकांच्या वतीने निषेध मोर्चा काढून आंदोलन करण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.