कोरेगाव भीमा -कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे (दि.6) एका युवकाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले असताना त्या रुग्णाच्या संपर्कातील पाच जणांना बाधा झाली आहे. पाच जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली आहे. शिरूर तालुक्यामध्ये एकाचवेळी एका घरातील जास्त व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह येण्याची पहिलीच घटना घडली आहे.
कोरेगाव भीमा येथे (दि.19) मार्चपासून 36 दिवसांचा मोठा लॉकडाऊन घेतल्याने पंचवीस ते तीस हजार लोकसंख्येच्या गावाला करोनापासून संरक्षित ठेवण्यास कृती समितीला यापूर्वी यश आले होते. मात्र, महिन्यापूर्वी गावात बाधित आढळला असताना पुन्हा (दि.6) कोरेगाव भीमात एक बाधित रुग्ण आढळला होता. त्यांनतर रुग्णाच्या संपर्कातील सात व्यक्तींचे स्वॅब तपासणीसाठी घेतलेले होते. त्या सात जणांपैकी पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
ग्रामपंचायतीच्या वतीने बाधित राहत असलेला परिसर सील केला आहे. संपर्ण गाव चौदा दिवस बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच संगीता कांबळे, उपसरपंच योगेश गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र सात्रस यांनी गाव निर्जंतुकीकरण केले आहे.
तलाठी अश्विनी कोकाटे, पोलीस पाटील मालन गव्हाणे यांनी परिसराची पाहणी करून गावातील व्यवहार बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाकडून तातडीची बैठक आयोजित करून उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात येत आहे. आरोग्य विभागाच्या वतीने पाचजणांच्या संपर्कातील अन्य व्यक्तींची माहिती काढण्याचे काम सुरू केले आहे.