कोपरगाव तालुक्‍यात अतिवृष्टी…!

पूर्व व मध्य भागात सुमारे तीन तास जोरदार पाऊस ः पिकांचे नुकसान, अनेक घरांत शिरले पाणी

कोपरगाव – राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर दुष्काळाने होरपळणाऱ्या कोपरगाव तालुक्‍यातील पूर्व व मध्य भागात शनिवारी (दि.22) रात्री तीन तास अतिवृष्टी झाली. त्यामुळे कोपरगावकरांची चांगलीच दाणादाण उडाली. कोपरगाव परिमंडळात 130 मिलिमीटर (5.5 इंच) पाऊस झाल्याची नोंद आहे. या पावसामुळे अनेक घरांत पाणी शिरले, तर पिकांचे मोठे नुकसान झाले.

या पावसाने अनेकांच्या शेतात व घरांत पाणी घुसले. त्यात 375 ते 400 घरे बाधीत झाली. जनावरे, संसारोपयोगी वस्तू, धान्याची पोती आदी साहित्य वाहून गेले. अनेक आदिवासींची घरे पडली, तर डाळिंब-पेरूच्या बागांसह पिकांचे प्रचंड नुकसान झाले. कांदा शेडमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही नुकसान झाले. अनेक जणांनी रात्र रस्त्यावर जागून काढली. अचानक आलेल्या नैसर्गीक आपत्तीची पाहणी साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, भाजप तालुकाध्यक्ष शरद थोरात, उपाध्यक्ष संजय होन, संचालक सुभाषराव आव्हाड, प्रदीप नवले, निवृत्ती बनकर, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र निकोले आदींनी पहाटपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी साईबाबा संस्थानच्यावतीने आपत्तीग्रस्तांना नाश्‍ता पाकिटांचे वाटप करून कोल्हे कारखान्याच्यावतीने जेवणाची सोय करण्यात आली.

दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घटनेची माहिती घेऊन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी करत या आपत्तीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री राम शिंदे यांना माहिती दिली. या जोरदार पावसात सुदैवाने जीवितहानी झाली नाही. बाधित कुटुंबांना त्या-त्या गावांतील जिल्हा परिषद शाळांत स्थलांतरित करण्यात आले आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याच्या आपत्ती निवारण व्यवस्थापनाने म्हसोबावाडी (धारणगाव) येथील पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांची सुटका केली. ब्राह्मणगाव भागातील मंडपी नाल्यात कमल विठ्ठल हांबरे ही महिला बुडत असताना तिला अनुराग येवले, प्रमोद बनकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचविले.

येवला तालुक्‍यातही मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तेथील निमगाव मढ, पारेगाव येथील पाणी मंडपी नाल्यात आल्याने व ब्राह्मणगाव शिवारातील बंधारे तुडुंब भरल्याने हे पाणी शेतीत साचले. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ब्राह्मणगाव शिवारातील मंडपी नाला परिसरात शेतकऱ्यांच्या मेंढ्या वाहून गेल्या. टाकळी-धारणगाव रस्त्यावरील व्यापारी राजेंद्र सांगळे, ललितकुमार तेजमल, द्वारकानाथ अडांगळे, संतोष ठक्कर, महेंद्र ठक्कर आदी व्यापाऱ्यांचा साठवलेला पाण्यात वाहून गेला. हा कांदा थेट कोपरगाव खडकी शिवारापर्यंत वाहून आला.

या नुकसानग्रस्त कांदा व्यापाऱ्यांचे बिपीन कोल्हे यांनी सांत्वन करत शासनाकडे सर्वतोपरी मदत करावी, अशी मागणी केली. गेल्या वर्षी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधत विधानसभेचे सभापती हरिभाउ बागडे यांच्या हस्ते आपत्ती निवारण पथक स्थापन करण्यात आले होते. त्यानंतर 21 जून रोजी चांदेकसारे परिसरातील आनंदावाडी येथे 70 मिलिमीटर पाऊस पडून 258 नागरिक पावसाच्या पाण्यात अडकले होते. त्यांना या यंत्रणेने वाचविले. याही वर्षी 22 जून 2019 रोजी आपत्ती आली असता संजीवनीच्या डिझास्टर मॅनेजमेंटच्या सहकाऱ्यांनी अनेकांचे प्राण वाचविले. त्यातच आपले समाधान आहे, असे कोल्हे म्हणाले. टाकळी ब्राम्हणगाव धामोरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसाचे गुडगाभर पाणी होते. ते पोकलेनच्या साह्याने काढून देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.