केरळात पुन्हा मुख्यमंत्री विजयन यांनीच मारली बाजी; कॉंग्रेसचे आव्हान ठरले फुसके

डाव्या आघाडीचे स्पष्ट बहुमतासह पुनरागमन

थिरुनंतपुरम – केरळ विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीने राज्यात सलग दुसऱ्यांदा बहुमत मिळवले आहे. डावी आघाडी आणि कॉंग्रेस यांना आलटून पालटून सत्ता देण्याचा क्रम या राज्यात गेले काही वर्षे सुरू होता. पण त्याला यंदा तेथील जनतेने फाटा देत डाव्या आघाडीच्याच हातात पुन्हा सत्ता दिली आहे.

कॉंग्रेसला या राज्यात सक्षम आव्हान उभे करण्यात अपयश आले. राहुल गांधी याच राज्यातून लोकसभेवर निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांच्या करिष्म्याचा कॉंग्रेसला लाभ होईल ही अपेक्षाही येथे फोल ठरली आहे. कॉंग्रेसच्या जवळपास दुप्पट जागा डाव्या आघाडीने येथे पटकावल्या आहेत. त्यामुळे हा मुख्यमंत्री विजयन यांच्या नेतृत्वाचा करिष्मा मानला जातो.

140 सदस्यांच्या विधानसभेत डाव्या आघाडीला 91 आणि कॉंग्रेसला 45 जागा मिळाल्या. गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा कॉंग्रेसला केवळ तीन जागांची बढत मिळाली. कॉंग्रेसच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याविषयी रंगलेला वाद, तिकीट वाटपात झालेला घोळ आणि एकसंधपणे निवडणुकीला सामोरे जाण्यास आलेले अपयश यामुळे कॉंग्रेसला येथे सत्ता मिळवणे दुरापास्त ठरले. 

राहुल गांधी यांनी ज्या प्रमाणात येथे प्रचार करणे अपेक्षित होते, त्या प्रमाणात त्यांनी येथे लक्ष घातले नाही हेही एक कारण त्यासाठी पुढे केले जात आहे. केरळमध्ये भारतीय जनता पक्षाचे अस्तित्व अत्यंत नगण्य आहे. 

त्यामुळे कॉंग्रेसला थेट डाव्या आघाडीशी टक्‍कर द्यावी लागणार असल्याने त्यांना तुलनेत हे आव्हान फार अवघड नव्हते. पण भविष्यातील राजकारणात डाव्या आघाडीचा आपल्याला उपयोग करून घ्यायचा आहे, असे गणित मनाशी बाळगलेली कॉंग्रेस इर्षेने या निवडणुकीच्या राजकारणात उतरलीच नाही, त्याचाही फटका त्यांना बसल्याचे मानले जाते. 

मुख्यमंत्री विजयन यांची शांत आणि धीरोदात्त प्रतिमा तसेच त्यांनी राबवलेले काही प्रभावी सरकारी कार्यक्रम डाव्या आघाडीच्या यशाला कारणीभूत ठरले. मेट्रोमॅन म्हणून देशभर नावाजलेले ई श्रीधरन यांना पुढे करून भारतीय जनता पक्षाने या राज्यात आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयोग सपशेल फेल गेला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.