बंगळुरू : कर्नाटकमधील राजकारण कथित २ घोटाळ्यांवरून तापले आहे. अशात थेट मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि माजी मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांच्यात आता जुंपल्याचे दिसून येत आहे.
भाजप आणि जेडीएस या कर्नाटकमधील विरोधी पक्षांनी मुडा घोटाळ्यावरून सिद्धरामय्या आणि कॉंग्रेस सरकारला घेरले आहे. त्याला शह देण्यासाठी सत्ताधारी कॉंग्रेसने कोविड घोटाळ्याचा आधार घेतला आहे. कर्नाटकात याआधी भाजपची सत्ता असताना आणि येडियुरप्पा मुख्यमंत्री असताना तो घोटाळा झाल्याचा आरोप आहे. त्या आरोपानुसार, करोना संकटकाळात विविध उपकरणे आणि औषधांच्या खरेदी प्रक्रियेत घोटाळा झाला.
त्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी सत्तेत आल्यानंतर कॉंग्रेसच्या सरकारने आयोग नेमला. संबंधित आयोगाने येडियुरप्पा आणि तत्कालीन आरोग्य मंत्री बी.श्रीरामुलू यांच्या विरोधात खटला चालवण्याची शिफारस केली आहे. त्यावर येडियुरप्पा यांनी तीव्र प्रतिक्रिया देत सिद्धरामय्या यांच्यावर निशाणा साधला. कुठल्याही प्रकारच्या धमक्यांनी आम्ही घाबरण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
गतकाळातील गोष्टी उकरून कॉंग्रेस सरकार संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, त्यातून काहीच साध्य होणार नाही, असे येडियुरप्पा यांनी म्हटले. त्यानंतर सिद्धरामय्या यांनी पलटवार केला. आम्ही कुठल्या पोकळ धमक्या देत नाही. माजी न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली आम्ही आयोग नेमला. त्या आयोगाने दिलेल्या अहवालाच्या आधारे कारवाई होईल. त्याबाबतची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर येडियुरप्पा काय करतात ते पाहू.
न्याययंत्रणेचा वापर न्यायासाठी होत असतो. गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हायला नको का, अशी विचारणा करत त्यांनी येडियुरप्पांना प्रतिआव्हान दिले. आयोगाच्या शिफारसीवर लवकरच राज्य मंत्रिमंडळ विचार करणार आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर कोविड घोटाळ्याचा तपास सुरू होणार असल्याचे समजते.