कराड, {राजेंद्र मोहिते} – सध्या राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागले असून त्यादृष्टीने प्रत्येक मतदारसंघातील नेत्यांनी आपापल्या मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे. त्यानुसार कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातही राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून याठिकाणी विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्याविरोधात भाजपने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे.
लोकसभेच्या निकालामध्ये उत्तरेत भाजपने मोठी मुसंडी मारली असली, तरीही विधानसभेच्या बदलत्या समीकरणांनुसार बाळासाहेबांचा असलेला दांडगा जनसंपर्क, जनतेच्या सुख-दु:खाच्या कार्यक्रमांना उपस्थिती, मतदारसंघातील राबता,
जनमानसात मिसळणारे नेतृत्व म्हणून येथील जनता वारंवार त्यांनाच मतांचा कौल देत असल्याने सध्य घडीला तरी उत्तरेत राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याचे दिसून येत आहे. उत्तरेतील जनता बाळासाहेब पाटील यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.
2019 च्या निवडणुकीमध्ये आ. बाळासाहेब पाटील हे तब्बल 1 लाख 509 मते मिळवून 49 हजार 215 मतांनी विजयी झाले होते. या निवडणुकीत ऐन वेळेला उमेदवारीची माळ गळ्यात न पडल्याने अपक्ष म्हणून लढलेल्या मनोज घोरपडे यांना 51 हजार 294 मते मिळाली.
तर शिवसेनेचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना 39 हजार 791 मते मिळाली होती. याठिकाणी कदम आणि घोरपडे यांच्यात समेट न झाल्याचा फायदा आ. पाटील यांना झाला.
तर 2014 च्या निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील हे 78 हजार 324 मते मिळवून 20 हजार 507 मतांनी विजयी झाले होते. यावेळी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांना 57 हजार 817 मते मिळाली. तर स्वाभिमानीचे उमेदवार मनोज घोरपडे यांना 43 हजार 903 मते मिळाली होती.
याहीवेळी कदम आणि घोरपडे यांच्यातील दुहीचा फायदा बाळासाहेब पाटील यांना झाल्याचे दिसून आले. मात्र, या दोन्ही निवडणुकीत आ. बाळासाहेब पाटील यांनीच त्यांच्या मुसद्देगिरीतून विरोधकांना बाळकडू दिल्याचे दिसून आले होते.
एकंदरीत 2019 आणि 2014 च्या विधानसभा निवडणुकांच्या मतांची तुलना करता धैर्यशील कदम यांच्या मतांची टक्केवारी 2014 पेक्षा 2019 मध्ये तब्बल 18 हजार मतांनी घटल्याचे दिसून आले. यावरून 2014 मध्ये काँग्रेसमधून निवडणूक लढवल्यामुळेच त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाल्याचे स्पष्ट होते.
तर 2014 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनोज घोरपडे यांनी 2019 मध्ये दुसऱ्या क्रमांकावर मुसंडी मारत 2014 पेक्षा 2019 मध्ये 7 हजार 391 एवढी अधिकची मते मिळवली. तर विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांनी 2014 पेक्षा 2019 मध्ये 22 हजार 185 एवढी अधिकची मते मिळवली होती. एकूणच या मतांच्या आकडेवारीवरून उत्तरेत राष्ट्रवादीचा दबदबा असल्याचे दिसून येते.
परंतु, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांनी महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना उत्तरेतून मोठे मताधिक्य दिले आहे.
त्यामुळे मतदारसंघात या दोन्ही नेत्यांची वाढलेली ताकद पाहता उत्तरेत भाजपच्या मताधिक्यातही घसघशीत वाढ झाल्याचे स्पष्ट दिसून येते. या सर्व समीकरणांनुसार उत्तरेतील तीनही नेत्यांनी आपापल्या पातळीवर मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली असून येत्या विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये चांगलीच टशन होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
मतदारसंघात कोट्यवधींची विकासकामे
सह्याद्रि सहकारी साखर कारखाना, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री आणि जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, तसेच उत्तरेचे विद्यमान आमदार म्हणून बाळासाहेबांनी मतदारसंघात कोट्यावधींची विकासकामी केली आहेत.
तसेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून गट आणि गणात केलेली कामे, तसेच जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्यासाठी केलेल्या अनेक कामांमुळे उत्तरेतील जनता बाळासाहेब पाटील यांच्याच पाठीशी असल्याचे दिसून येत आहे.
…तर, राष्ट्रवादीपुढे भाजपचे कडवे आव्हान?
2014 व 2019 च्याविधानसभा निवडणुकांमध्ये उत्तरेतील नेते मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यातील दुहीचा तोटा भाजपला सोसावा लागला.
त्यामुळे आता 2024 मध्ये ती चूक सुधारून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी मनोज घोरपडे आणि धैर्यशील कदम यांच्यात समेट घडवून एकाच उमेदवार दिल्यास याठिकाणी विद्यमान आ. बाळासाहेब पाटील यांच्यापुढे नक्कीच कडवे आव्हान उभे राहणार आहे.
असे झाल्यास याठिकाणी कॉंग्रेसची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे आगामी काळात याठिकाणी नेमक्या काय घडामोडी घडणार, याकडे उत्तरेतील जनतेचे लक्ष लावून राहिले आहे.