झारखंडमध्ये तिसऱ्या टप्प्यासाठी 62 टक्के मतदान

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी गुरूवारी 62 टक्‍क्‍यांहून अधिक मतदान झाले. त्यामुळे 309 उमेदवारांचे भवितव्य इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले.

तिसऱ्या टप्प्यात झारखंडच्या 8 जिल्ह्यांमधील विधानसभेच्या 17 जागांसाठी शांततेत मतदान झाले. या टप्प्यात नशीब आजमावणाऱ्या प्रमुख उमेदवारांमध्ये माजी मुख्यमंत्री बाबूलाल मरांडी, माजी उपमुख्यमंत्री सुदेश माहतो आणि भाजपच्या काही विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण 81 जागा आहेत.

त्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यांत मतदान होत आहे. पहिल्या तीन टप्प्यांत मिळून 50 जागांसाठी मतदान झाले. आता चौथ्या टप्प्यात 15 जागांसाठी 16 डिसेंबरला तर अंतिम टप्प्यात 16 जागांसाठी 20 डिसेंबरला मतदान होईल. त्यानंतर 23 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.

त्या राज्यात भाजप सत्तेवर आहे. सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर सत्ता परिवर्तनासाठी विरोधक जंग-जंग पछाडत आहेत. भाजपची प्रमुख लढत विरोधकांच्या महाआघाडीशी आहे. त्या महाआघाडीत झामुमो, कॉंग्रेस आणि राजदचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.