जपानमध्ये वादळातील मृतांची संख्या 66 वर

टोकियो: जपानमध्ये धडकलेल्या भीषण तुफानातील मृतांचा आकडा मंगळवारी 66 वर पोचला, बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचे काम बचावकर्त्यांनी सलग दोन दिवस अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. शेकडो घरे मोडकळीस आली असून पूरामुळे पडलेल्या घरांच्या जागेवर केवळ चिखल झाला आहे. हजारो घरांचा पाणी आणि वीजपुरवठा दोन दिवसांनंतरही खंडीत राहिला आहे. मध्य आणि पूर्वेकडील जपानमध्ये आलेल्या हागिबीस वादळानंतर सुमारे पंधरा लोक अजूनही बेपत्ता आहेत, वादळात 200 हून अधिक लोक जखमी झाले, या वादळाचे नाव स्थानिक तागालोग भाषेत “वेग’ असे आहे.

सर्वाधिक जिवीतहानी टोकियोच्या उत्तरेकडील फुकुशिमा प्रांतात झाली आहे, तिथे अबुकुमा नदीच्या काठावर कमीतकमी 14 ठिकाणी नदीचे पात्र ओसंडून वाहत आहे. याच भागात अनेक शहरे आणि शेतजमिनीचे पट्टेही आहेत. फुकुशिमामध्ये किमान 25 जण मृत्यूमुखी पडले आहेत. फुकुशिमाच्या मोठ्या शहरांपैकी एक कोरियमा आहे, तेथे आलेल्या पूरामुळे नागरिकांना बचावाची संधीही मिळाली नाही.

कोणीही मागे राहिलेले नाही किंवा ज्यांना मदतीची गरज आहे, असे कोणी नसल्याची खात्री करण्यासाठी पोलिस घरोघर शोध घेत होते. नदीला यापूर्वी कधीच एवढा प्रचंड पूर आला नव्हता आणि काही घरे पूर्णपणे वाहून गेली आहेत. या क्षेत्रात बरेच वयस्कर आहेत आणि त्यापैकी बऱ्याच जणांना नातेवाईकांनी आपल्या घरी नेले आहे. बऱ्याच कुटूंबांच्या बागेचा काही भाग वाहून गेला असून पाण्याचे पाईप्स आणि वीज वाहक ताराही तुटल्या आहेत. सुमारे 1,33,000 कुटुंबे पाण्याविना तर 22,000 कुटुंबांना वीज नसल्यामुळे अंधारातच रहावे लागले आहे.

परंतु उत्तर भागात तापमान झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे तेथे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.
2011 मध्ये झालेल्या भूकंप आणि त्सुनामीने फुकुशिमा येथील दाइची अणुऊर्जा प्रकल्पाचे नुकसान झाले होते. त्या प्रकल्पामध्ये किरणोत्सर्ग असलेल्या दूषित पाण्याची गळती नसल्याचे त्या प्रकल्पाची मालकी असलेल्या टोकियो इलेक्‍ट्रिक पॉवर कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या वादळाचा आर्थिक परिणाम दीर्घकाळ जाणवू शकतो, असा इशारा पंतप्रधान शिंजो आबे यांनी दिला आहे. सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील जेणेकरून या आपत्तीत बळी पडलेल्या लोकांना लवकरात लवकर आपले सामान्य जीवन परत सुरू करता येईल, असे आबे यांनी संसदीय समितीला सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.