जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये इंडिया आघाडीला सत्ता मिळूनही कॉंग्रेसची कामगिरी मात्र सुमार ठरली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष तारिक हमिद कर्रा यांच्यावरून त्या पक्षाच्या प्रदेश शाखेत धुसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रीय स्तरावरील इंडिया आघाडीचे घटक असणाऱ्या कॉंग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि डाव्या पक्षांनी एकत्रितपणे जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक लढवली.
त्या आघाडीने एकूण ९० पैकी ४९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. अर्थात, त्या विजयात नॅशनल कॉन्फरन्सचे योगदान निर्णायक ठरले. त्या पक्षाने तब्बल ४२ जागा जिंकल्या. मित्रपक्षाने दमदार कामगिरी केली असली तरी कॉंग्रेसला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले. आता कॉंग्रेसच्या सुमार कामगिरीवरून त्या पक्षाच्या प्रदेश शाखेत दोन गट पडलेले दिसत आहेत.
एक गट थेट कर्रा यांना लक्ष्य करत आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर विकार रसूल वानी यांना हटवून कर्रा यांना प्रदेशाध्यक्ष बनवण्यात आले. मात्र, प्रदेशाध्यक्ष या नात्याने कर्रा प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत, असा दावा तो गट करत आहे. त्याउलट, दुसरा गट कर्रा यांना प्रदेशाध्यक्ष म्हणून अतिशय कमी कालावधी मिळाल्याकडे लक्ष वेधत आहे. कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत, असे दुसऱ्या गटाचे म्हणणे आहे.