बिचुकले कारागृहात

धनादेश न वटल्याच्या प्रकरणात जामीन : खंडणी प्रकरणात जामीन फेटाळला

सातारा -धनादेश न वटल्याप्रकरणी सातारा पोलीसांनी अटक केलेला साताऱ्यातील कवी मनाचा नेता अभिजित बिचुकले याची अखेर सातारा कारागृहात रवानगी झाली. शुक्रवारपासून सातारा पोलिसांच्या ताब्यात असलेल्या अभिजित बिचुकलेला धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र, सन 2012 मध्ये त्याच्यावर दाखल असलेल्या खंडणी प्रकरणात बिचुकलेचा जामीन न्यायालयाने फेटाळल्याने त्याची रवानगी कारागृहात रवानगी करण्यात आली.

नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रसिध्दीच्या झोतात असणारा अभिजित नुकताच एका वाहिनीवरील शोमुळे महराष्ट्रभर गाजत आहे. मात्र, 28 हजारांच्या धनादेश न वटल्याप्रकरणी त्याच्या विरोधात संदीप संकपाळ यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दिली होती. त्यानंतर अभिजितने न्यायालयातून त्या प्रकरणात जामीन घेतला होता.

मात्र, त्यानंतर होणाऱ्या न्यायालयीन कामकाजासाठी हजर राहणे आवश्‍यक असतानाही तो गैरहजर राहिला होता. वेळोवेळी त्याला हजर राहण्याची समज दिल्यानंतरही तो गैरहजर राहिला होता. अखेर दि. 15 जून रोजी न्यायाधीश आवटे यांनी अभिजीतला अटक करून हजर करण्याचे आदेश दस्तुरखुद्द जिल्हा पोलीस अधीक्षकांनाच दिल्याने पोलीस यंत्रणा कामाला लागली.

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेला अभिजीतला अटक करून न्यायालयात हजर करण्याच्या सूचना दिल्यानंतर त्याला “बिग बॉस’च्या सेटवरूनच शुक्रवारी अटक केली. दरम्यान, अभिजितला घेऊन येणारे पोलीस न्यायालयीन वेळेपर्यंत साताऱ्यात न आल्याने त्याला सातारा शहर पोलीसांच्या ताब्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

मात्र, शनिवारी पहाटे त्याचा रक्तदाब वाढल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते.शनिवारी सकाळी अकरा वाजता वैद्यकीय सूत्रांनी अभिजित “फिट’ असल्याचे कळवल्यानंतर त्याला दुपारी बाराच्या दरम्यान मोठ्या पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायाधीश आर. व्ही. पाटील यांच्यासमोर सुनावणी झाली.

त्यावेळी अभिजितचे वकील ऍड. शिवराज धनावडे तर फिर्यादीच्या वतीने स्वत: संदीप संकपाळ यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर न्यायाधीशांनी अभिजितला धनादेश न वटल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला.मात्र, अभिजितवर 2012 मधील साताऱ्यातील फिरोज पठाण यांना खंडणी मागितल्याचा गुन्हा सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला होता.

त्याही प्रकरणात बिचुकले न्यायालयीन कामकाजात नियमित हजर राहत नव्हता. दि. 22 रोजी न्यायालयात आलेल्या बिचुकलेवर आणखी काही गुन्हे आहेत का, याची पडताळणी केली. त्यावेळी खंडणीप्रकरणातही त्याला वॉरंट असल्याचे समोर आल्यानंतर त्या प्रकरणात त्याचा जामीन न्यायालयाने फेटाळल्याने त्याची रवानगी जिल्हा न्यायालयात करण्यात आली.

कारागृह हाऊस फुल… बिचुकले रुग्णालयात

जिल्हा कारागृहाची कैदी क्षमता फक्त 159 कैद्यांची आहे. मात्र, सध्या 240 कैदी या कारागृहात असल्याने अभिजित बिचुकले याला सातारा कारागृहात प्रवेश नाकारण्यात आला. त्यानंतर सातारा कारागृह प्रशासनाने त्याला कोल्हापूर येथील कळंबा जेलला पाठवण्याची कायदेशीर पूर्तता केली. मात्र, दरम्यान अभिजितचा रक्तदाब वाढल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)