पुणे – मध्य रेल्वेने करोनाच्या पार्श्वभूमीवर इन हाऊस रोबोटस आणि रोबोटिक्स उपकरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे करोनाच्या कालावधीत रेल्वे कर्मचाऱ्यांना मदत होत असून, काम देखील “कॉन्टॅक्टलेस’ होत आहे.
मध्य रेल्वेची प्रवासी सेवा करोनाच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्यात आली. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर या विभागांतर्गत मार्च महिन्यापासून श्रमिक विशेष, पार्सल गाड्या, विशेष प्रवासी गाड्या सोडण्यात येत आहेत. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ कायम आहे. या कालावधीत स्थानकावर करोनाचा अधिक प्रादुर्भाव होऊ नये, या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्यात येत आहे.
स्टेशनवर येणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्यासाठी मध्य रेल्वेने “फेब्रीआय’ आणि “रोबोटिक कॅप्टन अर्जुन’ची निर्मिती केली असून, ही दोन्ही रोबोटिक उपकरणे थर्मल आधारित स्क्रीनिंग सिस्टम आहेत. तर “एटीएमए’चा (स्वयंचलित तिकिट व्यवस्थापन प्रवेश) वापर करण्यात येत असून, यामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय तिकीट तपासणीचा समावेश आहे. यासह अनेक स्थानकांवर “बॅगेज रॅपिंग’, “सॅनिटायझेशन’, “आरोग्य एटीएम कियॉस्क’ची यंत्रणा बसविण्यात आली आहे. याशिवाय रेल्वे रुग्णालयांमध्ये “रक्षक’, “मेडीबोट जिवक’ आदी रोबोट फायदेशीर ठरत असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी तयार केलेल्या रोबोट आणि रोबोटीक्स उपकरणांची “कॉन्टॅक्टलेस’ कामकाजासाठी रेल्वे स्थानके, रेल्वे रुग्णालयांना कोविडचा सामना करताना मदत होत असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.