चंदीगड – देशभरामध्ये सध्या १७व्या लोकसभेची स्थापना करण्यासाठी निवडणुका सुरु आहेत. आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे ३ टप्पे पार पडले असून यंदा देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुका ७ टप्प्यांमध्ये पार पडणार आहेत. सध्या काही लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारी दाखल करून घेण्याचे कामकाज देखील सुरु आहे. दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या अंतिम टप्प्यात १९मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार असलेल्या पंजाबमधील संगरूर लोकसभा मतदारसंघामधून आज काँग्रेसचे उमेदवार केवल धिल्लो यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
धिल्लो यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबतच आपल्या संपत्तीबाबतची माहिती देखील जाहीर केली असून धिल्लो यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे केवळ ४००० रुपयांची रोकड आहे. हातात केवळ ४००० रोकड असल्याने आपल्याला काँग्रेस उमेदवार केवल धिल्लो आर्थिक विवंचनेत असल्याचे भासू शकते मात्र तसं नाहीये. धिल्लो यांच्याकडे केवळ ४००० रुपये रोकड असली तरी त्यांची स्थावर आणि अस्थावर संपत्ती बक्कळ आहे. धिल्लो यांच्याकडे एकूण १३१ कोटींची संपत्ती असून त्यांचा बँक बॅलन्स २० कोटी एवढा आहे. धिल्लो यांनी जाहीर केलेली संपत्ती ही त्यांच्या व त्यांच्या पत्नीच्या नावावर असलेली एकत्रित संपत्ती असून त्यांच्या पत्नीकडे १०.३१ कोटी बँक बॅलन्स आहे.