विवेकानंद काटमोरे
हडपसर – विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ( दि.२०) घेण्यात आलेल्या मतदानासाठी हडपसर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक पुरुषच मतदानाचा हक्क बजावण्यात सरस ठरल्याचे दिसून आले. या मतदान प्रक्रियेत १,६६,७३३ पुरुषांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला, तर १,४६,७८१ महिलांनी मतदानाचा हक्क बजावल्याचे दिसून आले. म्हणजेच, महिलांच्या तुलनेत तब्बल १९९५२ पुरुष मतदारांनी मतदान प्रक्रियेप्रती आपली जागरूकता दाखवून दिली आहे.तर, मतदार संघात गत विधानसभेच्या तुलनेत वाढलेली एकूण टक्केवारी आणि त्यातही पुरुषांच्या मतांचा वाढलेला दीड टक्का कोणत्या उमेदवाराला फायद्याचा ठरणार हे निकाल लागल्यावरच समजेल.
हडपसर विधानसभा मतदार संघाची निवडणूक प्रक्रिया बुधवारी (दि.२०) पार पडली. या निवडणुकीत ५०.११ टक्के मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून आमदार निवड करण्यात आपला रस दाखविला.सरकारच्या लाडक्या बहीण योजनेमुळे महिला मतदारांची संख्या मोठी असेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.
परंतु ,या निवडणुकीत महिलांच्या तुलनेत पुरुष मतदारांनी राज्य स्तरावरील राजकारणाप्रती ते जास्त जागरूक असल्याचे दाखवून दिले. त्याचे असे की, निवडणुकीत १,६६,७३३ पुरुष मतदारांनी, तर १,४६,७८१ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
म्हणजेच, म्हणजेच महिलांच्या तुलनेत १९९५२ पुरुष मतदारांची संख्या जास्त दिसून आली. १३ इतर मतदारांनी मतदान केले. हडपसर विधानसभा मतदारसंघात ६,२५,६७५ मतदार आहेत. त्यात ३२८०८२ पुरुष, २९७५१५महिला आणि इतर ७८ अशी वर्गवारी आहे.
पुरुषांच्या वाढत्या सहभागाचा फायदा कोणाला?
लाडकी बहीण योजनेमुळे महिला मतदारांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत अधिक होईल असे राजकीय वर्तुळात चर्चिले जात होते .ही योजना महिलांसाठी विशेष सवलती आणि सुविधांचे आश्वासन देते, ज्यामुळे महिला मतदारांचे लक्ष वेधले गेले. परंतु, हडपसर विधानसभा मतदार संघ त्याला अपवाद ठरल्याचे झालेल्या मतदानातून दिसून येत आहे. महिलांच्या पेक्षा पुरुषांच्या मतांची टक्केवारी दीड टक्क्यांनी अधिक आहे. मतदारसंघात या वाढलेल्या टक्केवारीचा फायदा महायुतीला होणार की महाविकास आघाडीला, हे निकालांनंतर स्पष्ट होईल.
हडपसरमध्ये ९४६ टपाली मतदान
हडपसर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत जे कर्मचारी निवडणुकीच्या कामकाजासाठी समाविष्ट करून घेण्यात आले आहेत. त्यांच्यासाठी मतदान कक्ष सुरू करण्यात आला होता. मतदान केंद्रावरील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, पोलिस कर्मचारी, होमगार्ड यांना मतदानाचा हक्क बजावता यावा म्हणून येथील विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह व शेवटचे दोन दिवस साधना विद्यालय येथे ११ ते १९ नोव्हेंबर दरम्यान टपाली मतदान केंद्र सुविधा कक्ष स्थापन केला होता. त्यात सुमारे ९४६ टपाली मतदान झाले.