गोव्यात कॉंग्रेसची जीएफपी पक्षाशी आघाडी

पणजी – गोव्यात विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने गोवा फॉरवर्ड पक्षाशी आघाडी केली आहे. काल रात्री कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत या पक्षाच्या नेत्यांनी या आघाडीवर शिक्‍कामोर्तब केले.

हा पक्ष आतापर्यंत भाजपप्रणीत एनडीए आघाडीत होता. पण त्यांनी आता भाजपची साथ सोडून कॉंग्रेसशी आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षाशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न तृणमूल कॉंग्रेसने चालवला होता.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांची तृणमूलच्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी चर्चाही केली होती. पण या पक्षाने कॉंग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसने राहुल गांधी यांचा विजय सरदेसाई आणि त्यांच्या पक्षाच्या अन्य नेत्यांबरोबरचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करीत या आघाडीची घोषणा केली आहे.

दरम्यान, कॉंग्रेस आणि जीएफपी या पक्षात आघाडी झाल्याने तृणमूल कॉंग्रेसचा मात्र चांगलाच जळफळाट झाला आहे. त्यांच्या पक्षाच्या नेत्या महुआ मोईत्रा यांनी ट्‌विटरवर दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, भाजपशी आघाडी सरकार स्थापन करणाऱ्या गोवा फॉरवर्ड पक्षाला भाजप हा अचानक राक्षसी प्रवृत्तीचा पक्ष वाटू लागल्याने त्यांनी कॉंग्रेसला मिठी मारली आहे. दरम्यान, विजय सरदेसाई यांनी कॉंग्रेसबरोबर झालेल्या चर्चेविषयी समाधान व्यक्‍त करीत आमचीच आघाडी गोव्यात सत्तेवर येईल, असा दावा केला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.