पुणे – पुणेकर पुरते गारठले!

– ऐन फेब्रुवारीत पारा 5.1 अंशांपर्यंत अचानक घसरला
– नाशकात नीचांकी 4 अंश सेल्सि. तापमान नोंद
– मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा अंदाज

  
पुणे – राज्याच्या हवामानात वेगाने बदल होत असल्याने तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. दोन दिवसांपूर्वी असलेल्या उकाड्यानंतर अचानक थंडीचा कडाका वाढला आहे. पुणे शहरात आज सर्वांत कमी म्हणजे 5.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर राज्यात सर्वांत कमी तापमान नाशिक येथे 4 अंश सल्सिअस नोंदविले गेले. राज्यात आगामी काळात थंडी वाढण्याची शक्‍यता आहे तर रविवारपासून (दि.10 ) मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ हवामानासह हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा आल्याने जवळपास आठवडाभर राज्यातील थंडी कमी झाली होती, मात्र राजस्थान आणि गुजरातमध्ये असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती विरून गेली आहे. पाकिस्तान आणि जम्मू- काश्‍मीरलगत पश्‍चिमी चक्रावाताची स्थिती आणि त्यापासून पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा (द्रोणीय स्थिती) सक्रिय आहे. यामुळे गुजरात किनारपट्टी, महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यालगत ताशी 35 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. यामुळे वादळसदृश स्थिती निर्माण झाली.

पाकिस्तान आणि परिसरावरून गुजरात, महाराष्ट्राकडे थंड वाऱ्यांचे प्रवाह येत आहेत. परिणामी, मध्य महाराष्ट्र, कोकणात अनेक ठिकाणी, तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी किमान तापमान पुन्हा सरासरीपेक्षा 1 ते 5 अंशांची घसरले आहे. गुजरात आणि मध्य प्रदेशात रविवारपर्यंत थंडीची लाट येण्याची शक्‍यता असून, राज्याच्या उत्तर भागात गारठा वाढण्याचा अंदाज आहे. यातच पावसाला पोषक हवामान तयार होत आहे.

अचानक 5 अंशांची घट

पुण्यात शनिवारी तापमानाचा पारा 5 अंशांपर्यंत घसरला आहे. गेले दोन दिवसांपासून तापमानाचा पारा सतत खाली घसरत आहे. शुक्रवारी किमान तापमान हे 10 अंशावर होते. त्यात एकदम घट झाली आहे. सरासरी तापमानाच्या तब्बल 6 अंशांनी घट झाली आहे. यापूर्वी 1 फेब्रुवारी 1934 रोजी सर्वांत कमी म्हणजे 3.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. दुसरीकडे कमाल तापमानही जे दोन दिवसांपूर्वी 29 ते 30 अंशांपर्यत होते. त्यातही 3 अंशांची घट झाली आहे. शहरात रविवारीही थंडीचा कडाका कायम राहण्याचा अंदाज आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.