शिस्तभंगप्रकरणी डॉक्‍टर, अभियंत्याची वेतनवाढ रोखली

पिंपरी – विनापरवाना गैरहजर राहून, सहकारी महिला कर्मचाऱ्याला मानसिक त्रास दिल्याप्रकरणी वायसीएममधील वैद्यकीय अधिकाऱ्याची एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर कामातील हलगर्जीपणाबद्दल एका कनिष्ठ अभियंत्याच्या दोन वेतनवाढ रोखल्या आहेत. डॉ. विनायक पाटील आणि कनिष्ठ अभियंता गणेश राऊत या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उचलण्यात आला आहे. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी या कारवाईचे आदेश दिले आहेत.

डॉ. पाटील हे महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी (गट ब) पदावर कार्यरत आहेत. पाटील हे बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) वारंवार गैरहजर असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी वायसीएमला दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत डॉ. पाटील अथवा कोणताही कनिष्ठ कर्मचारी त्याठिकाणी उपस्थित नसल्याने बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठी रांग लागली होती. याबाबत डॉ. पाटील यांना विचारणा केली असता, त्यांनी वरिष्ठांना उद्धटपणे उत्तरे दिली. याशिवाय एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्याला मोबाईलवरुन मेसेज पाठवत कामावरून कमी करण्याची धमकी दिली होती. या सर्व दोषारोपांमुळे त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू होती. त्यामध्ये ते दोषी आढळले. तसेच त्यांनी दिलेले स्पष्टीकरण महापालिका प्रशासनाला संयुक्‍तिक नाही. त्यामुळे त्यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दुसऱ्या प्रकरणात महापालिकेच्या “अ’ प्रभागात विद्युत हायमास्क दिवे बसविण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्याकरिता पुरेशी तरतूदही होती. हे दिवे प्रत्यक्षात बसविले की नाही याची खात्री न करता तसेच निविदा नस्ती उपलब्ध नसताना देखील या कामाचे बिल अदा करण्यात आले होते. ही महत्वाची कागदपत्रे राऊत यांनी हेतुपूर्वक गहाळ केल्याचा आरोप चौकशीत सिद्ध जाला होता. तसेच सायन्स पार्क येथे रोहित्र संच बसविण्याचा आदेश न देताच, रोहित्र संचाचे बिल काढून महापालिकेची फसवणूक झाली होती. ही सर्व जबाबदारी राऊत यांची असताना त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आरोप सिद्ध झाले. त्यांनी सादर केलेला खुलासा समाधानकारक नसल्याने त्यांच्या दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.