72 लाख कुटुंबांना मोफत रेशन
नवी दिल्ली – दिल्लीत केजरीवाल सरकारने रोजंदारी बुडालेल्या बांधकाम क्षेत्रातील मजुरांना मदतीचा हात देत त्यांच्या खात्यावर प्रत्येकी पाच हजार रुपयांची मदत पोहोचवण्याचा उपक्रम सुरू केला असून त्यांनी दिल्लीकर 72 लाख कुटुंबीयांना महिनाभर पुरेल इतके रेशन मोफत वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी लोकांना उपाशी राहावे लागणार नाही याची काळजी घ्यायची ठरवले आहे त्यासाठी सरकारी यंत्रणा अहोरात्र राबत असल्याचे नमूद केले आहे. नागरिकांची पुरवठ्याअभावी अडचण होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे आश्वासन दिले आहे. पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनचा आदेश तंतोतंत पाळण्याचे आवाहन केले आहे.
दिल्लीतल्या व्यवस्थेबद्दल त्यांनी नायब राज्यपालांबरोबर बैठक घेतली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आरोग्य व्यवस्था आणि प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोठेही अडवले जाणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी दिली असून मात्र अशा कर्मचाऱ्यांनी जवळ ओळखपत्रे ठेवावीत अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
लोकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांनाही सरकारी ओळखपत्रे जारी केली जातील, असे त्यांनी नमूद केले आहे. अपंग, विधवा आणि ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी पेन्शन या काळात दुप्पट करण्यात आल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. नाईट शेल्टरमध्ये राहणाऱ्या नागरिकांना मोफत जेवण देण्याचीही महत्त्वाची घोषणा त्यांनी केली आहे.