मुंबई – करोनाच्या पार्श्वभूमीवर मासिक वेतनात 10 टक्के कपात करण्याच्या एअर इंडियाच्या निर्णयाला एअर इंडिया कर्मचारी संघटनेने हायकोर्टात आव्हान दिले आहे. ऑल इंडिया एअरक्राफ्ट इंजिनीअर असोसिएशन, ऑल इंडिया सर्व्हिस इंजिनियर्स असोसिएशन आणि इंडियन पायलट गिल्ड यांनी एअर इंडिया आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेस लि. यांच्याविरोधात याचिका दाखल केली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर 20 मार्चपासून पुढील तीन महिने केबिन क्रू वगळून इतरांच्या वेतनात 10 टक्के कपात करण्यात येईल, असा निर्णय एअर इंडियाने घेतला. याचिकेनुसार, त्याचदिवशी केंद्र सरकारने देशभरतील सर्व खासगी आणि सार्वजनिक कंपन्यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना कमी न करण्याची व वेतनात कपात न करण्याची सूचना दिली.
लॉकडाऊनपर्यंत सर्व कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात करू नये, अशी सूचना केंद्रीय गृह सचिवांनी 29 मार्च रोजी आपत्कालीन व्यवस्थापन कायदा अंतर्गत दिली, असे याचिकेत म्हटले आहे. त्यामुळे एअर इंडियाचा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशाचेही उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे जाहीर करावे, अशी मागणी संघटनेनी केली आहे.