महाविद्यालयांमध्ये “सायकल बॅंक’

प्रभात पॉझीटीव्ह
महापालिकेचा उपक्रम : विद्यापीठाच्या मदतीने राबविणार प्रकल्प
सुनील राऊत

पुणे – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये सायकल वापराबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिका आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीच्या वतीने “सायकल बॅंक’ हा अभिनव उपक्रम रावविला जाणार आहे. शहरातील पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांत या बॅंक सुरू केल्या जाणार आहेत. त्यात प्रामुख्याने मुलांनी महाविद्यालयात येण्यासाठी दररोज सायकल वापरावी या उद्देशाने त्यांना संपूर्ण वर्षभरासाठी मोफत सायकल वापरण्यास दिली जाणार आहे. महाविद्यालयांमध्ये असलेल्या पुस्तक बॅंकेच्या धर्तीवर ही सायकल बॅंक उभारली जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या सायकल विभागाचे प्रमुख नरेंद्र साळूंके यांनी दिली.

शहरातील खासगी वाहनांची संख्या 40 लाखांच्या घरात पोहोचली आहे. महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या मते शहरात दरडोई सव्वा वाहने आहे. तर, या वाहनांची वाढ सातत्याने होतच असल्याने शहरातील प्रदूषणाची पातळी धोक्‍याच्यावर पोहोचू लागली आहे. ही बाब लक्षात घेऊन तीन ते चार दशकांपूर्वी सायकलींचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहराला ही ओळख पुन्हा मिळवून देण्यासह वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महापालिका प्रशासनाने शहरात “पब्लिक बायसिकल शेअरींग’ योजना सुरू केली असून या अंतर्गत शहरात पुढील काही वर्षांत तब्बल 1 लाख सायकल उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून नागरिकांची जनजागृती केली आहे.

त्या अंतर्गत महापालिकेने आता शहरातील महाविद्यालयांकडे आपला मोर्चा वळविला आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांची संख्या मोठी असून त्या ठिकाणी दरवर्षी हजारो विद्यार्थी दरवर्षी शिक्षण घेतात, यातील अनेक मुले राज्यभरातून आलेली असतात, त्यामुळे त्यांच्याकडून महाविद्यालयात येण्यासाठी पीएमपीचा अथवा खासगी वाहनांचा वापर केला जातो. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना महाविद्यालयांकडूनच मोफत सायकल दिल्यास त्यांचा वापर वाढणार आहे. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने पुणे विद्यापीठास सायकल बॅंकेचा प्रस्ताव दिला असल्याची माहिती साळूंके यांनी दिली.

…अशी असेल सायकल बॅंक

महापालिकेने दिलेल्या पत्रानुसार, विद्यापीठाकडून संलग्न महाविद्यालयांना ही योजना राबविण्याचे पत्र दिले जाणार आहे. त्यानुसार, महापालिकेचा सायकल विभाग, महापालिकेस सायकल पुरविणाऱ्या कंपन्या तसेच महाविद्यालय प्रशासनाची संयुक्त समिती केली जाईल. त्यानुसार, महाविद्यालयांकडून विद्यार्थांना याची कल्पना देऊन किती मुले सायकल घेण्यास इच्छूक असतील याची माहिती घेतली जाईल. त्यानुसार, या कंपन्या संबंधित महाविद्यालयात सायकल उपलब्ध करून देतील. त्यानंतर मुलांना संपूर्ण शैक्षणिक वर्षासाठी ही सायकल मोफत दिली जाईल. तसेच शैक्षणिक वर्ष संपताना संबंधित मुलास महाविद्यालयास सायकल परत करावी लागेल. अशा पध्दतीने या सायकली प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या मुलांना दिल्या जातील, तसेच त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महापालिकेची असणार असल्याचे साळूंके यांनी स्पष्ट केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×