‘स्वच्छ पुण्यात’ वडगावशेरी, रामवाडी नाही का?

पुणे-नगर महामार्गावर सार्वजनिक स्वच्छतागृह नाही; स्वच्छता स्पर्धेत शहर कसे ठरणार नंबर वन

वडगावशेरी – स्वच्छ भारत स्पर्धेत पुणे शहराचा प्रथम क्रमांक यावा, याकरीता पुणे महानगरपालिकेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. याकरीता शहरातील अंतर्गत रस्ते तसेच महामार्गाकडेच्या भिंतीही संदेशाद्वारे रंगविल्या जात आहेत. परंतु, पुणे-नगर महामार्गावर असलेल्या वडगाव शेरी, रामवाडी, विमाननगर चौक परिसरात एकही सार्वजनिक स्वच्छतागृह (शौचालय) नसल्याने स्वच्छता स्पर्धेत पुणे नंबर एक कसे ठरणार? वडगावशेरी पुण्यात नाही का? असे प्रश्‍न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

पुणे-नगर महामार्गावर येथे स्वच्छतागृह नसल्याने प्रवासी तसेच नागरिकांची गैरसोय होत आहे. पुणे शहरातून बाहेर पडणाऱ्या महामार्गांपैकी सर्वाधिक व्यस्त मार्गांपैकी पुणे-नगर मार्ग ओळखला जातो. या मार्गावर रात्रं-दिवस वर्दळ असल्याने प्रवाशांसह नागरिकांचीही मोठी वर्दळ असते. मात्र, महामार्गावर ज्या सुविधा असणे गरजेचे असते, त्यापैकी स्वच्छतागृह, शौचालय या परिसरात असणे गरजेचे आहे. परंतु, पुणे-नगर मार्गावर याच मुलभूत सोयींची वानवा दिसत आहे. विशेष म्हणजे याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींकडून याबाबत संबंधीत प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आलेला असतानाही याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात येत आहे.

पुणे-नगर महामार्गावरील वडगाव शेरी परिसरात मोठी वर्दळ असते. स्थानिक नागरिकांसह अन्य भागात जाणारे-येणारे प्रवासी वाहने येथे थांबत असतात. यातून या परिसरात सकाळ ते रात्री उशीरापर्यंत मोठी वर्दळ असते, अशावेळी या परिसरात एखादे तरी स्वच्छतागृह, शौचालय असणे गरजेचे आहे. परंतु, याअभावी नागरिकांसह प्रवाशांची गैरसोय होत आहे. विशेषत: महिला प्रवाशांची यातून कुचंबना होत आहे.

स्वच्छतागृह नसल्याने अनेक वेळा पर्याय उघड्यावरच जावे लागत आहे. यातून दुर्गंधी तसेच अस्वच्छता पसरत आहे. स्वच्छतागृहा अभावी महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय हात आहे. या ठिकाणी अनेक पडीक, मोकळ्या जागा आहेत. त्यावर स्वच्छतागृह उभारले जावू शकते. परंतु, मनपाकडून या मुलभूत सुविधेकडेच दुर्लक्ष केले जात आहे. या भागात स्वच्छतागृह उभारण्यात यावे, अशी मागणी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते जालिंदर तारळकर यांनी पुणे मनपा आरोग्य विभागाकडे लेखी निवदेनाद्वारे लावून धरली आहे. रामवाडी ते विमाननगर चौक या ठिकाणी मध्यभागी कोठेही सार्वजनिक स्वच्छतागृह (शौचालय) उभारण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

रामवाडी येथे पूर्वी एक स्वच्छतागृह (शौचालय) होते. मात्र, हे शौचालय रात्रीच्या रात्री अचानक गायब झाले. निविदा काढून खर्च करून देखील अध्यपही या ठिकाणी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, असा आरोप नागरिकांकडून होत आहे. यामुळे रामवाडी ते विमाननगर चौक या ठिकाणी सार्वजनिक शौचालय उभारण्यात यावे, अशी मागणी आता श्री स्वामी विकास प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर तारळकर यांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.

मनपाकडे एकही प्रस्ताव नाही…
पुणे-नगर महामार्गा अलीकडे व पलीकडे प्रभाग 3 व प्रभाग 5 असे दोन प्रभाग आहेत. यामुळे 8 नगरसेवकांकडून मनपाला या विषयी एकही प्रस्ताव सादर केला गेलेला नाही. त्यामुळे सर्व नगरसेवकांनी एकत्र येऊन पुणे मनपाला या परिसरात सार्वजनिक स्वच्छतागृह (शौचालय) उभारण्यासाठी ठराव दिला तर लवकरात लवकर हा विषय मार्गी लागेल, अशी अपेक्षा नगरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.