बीजिंग: दक्षिण चीनमधील एका प्राथमिक शाळेच्या सुरक्षा रक्षकानेच तब्बल 39 जणांना भोसकल्याची घटना घडली आहे. गुआंक्सी झुआंग स्वायत्त प्रांतातील वांगफू भागातल्या प्राथमिक शाळेच्या परिसरात ही घटना घडली. सकाळी शाळा भरल्यानंतर थोड्याच वेळात सुरक्षा रक्षकाने धारदार सुरा घेऊन स्वैरपणे अनेकांवर वार करायला सुरुवात केली.
या हल्ल्यात शाळेतील मुख्याध्यापकही जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागील नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही. संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. जखमी झालेल्यांपैकी दोघाजणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे. मात्र अन्य जखमींना झालेली इजा प्राणघातक नाही.
चीनमध्ये कामावरून कमी केलेल्या कर्मचाऱ्यांकडून अथवा मानसिक आरोग्य बिघडलेल्या कर्मचाऱ्यांकडून चाकू हल्ले केले जाण्याच्या अनेक घटना पूर्वीच्या काळात घडलेल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात बीजिंगमध्येही अशाच प्रकारे प्राथमिक शाळेतील कर्मचाऱ्याने अनेकांवर चाकू हल्ला केला होता.
अनेकवेळा वैयक्तिक आकसापोटी अशा प्रकारे हल्ले केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. 2012 मध्ये एका बालवाडीत घुसून अशाप्रकारे चाकू हल्ला केला गेला होता.