सॅंटियागो, (चिली) – चिलीमध्ये घेण्यात आलेल्या सार्वमता दरम्यान नवीन पुरोगामी राज्यघटना फेटाळण्यात आली आहे. ( Chile voters reject progressive new constitution in referendum) चिलीमध्ये हुकुमशाही काळापासून सुरू असलेल्या राज्यघटनेच्या जागेवर नवी राज्यघटना लागू करण्याचा अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक (Chile’s President Gabriel Boric) यांनी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला आहे.
ही नवी राज्यघटना (Chile constitution) तयार करण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी लागला होता. त्यातील 24 मुद्यांना जोरदार विरोध झाल्यामुळे ही राज्यघटना देशातील नागरिकांकडून नाकारली जाण्याची शक्यताच अधिक होती. त्यामुळे आता अध्यक्षांना आता जुन्या राज्यघटनेच्या जागेवर लागू करण्यासाठी नवीन राज्यघटना तयार करावी लागणार आहे.
चिलीचे माजी अध्यक्ष जनरल ऑगस्टो पिनोचेत यांनी 41 वर्षांपूर्वी देशात बळजबरीने लागू केलेली राज्यघटना बदलून लोकशाहीवादी राज्यघटना लागू करण्यासाठी विद्यमान अध्यक्ष गॅब्रिएल बोरीक यांनी जोरदार प्रयत्न केले होते.
नव्या राज्यघटनेसाठी देशात घेण्यात आलेल्या सार्वमतादरम्यान 61.9 टक्के लोकांनी नव्या राज्यघटनेला विरोध दर्शवला. तर नव्या राज्यघटनेला केवळ 38.1 टक्के जनतेची पसंती मिळाली. नव्या राज्यघटनेबाबत जनता समाधानी नसल्याचे या सार्वमताद्वारे दिसून आले असल्याची प्रतिक्रिया अध्यक्षांनी दिली आहे. मात्र देशात लोकशाही प्रक्रिया राबवण्याचे प्रयत्न यामुळे थांबणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.