सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
पुणे – करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोणत्याही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रम, सभा, मोर्चे, मिरवणुका तसेच यात्रा, उत्सव आदींचे आयोजन करण्यास परवानगी नसल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले.
तसेच भूमिपूजन, उद्घाटन समारंभ व त्याचबरोबर मोठ्या संख्येने लोक एकत्र येतील, अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमास संपूर्णत: प्रतिबंध घातला आहे. जर या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित कार्यक्रमाचे आयोजक, जागा मालक यांच्यावर दंडात्मक तसेच फौजदारी स्वरुपाची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी यांनी हे आदेश जारी केले आहेत. मास्क नाही प्रवेश नाही, असा फलक सर्व दुकाने, उद्योग, बाजार आदी ठिकाणी लावण्यात यावा, याबाबतची जबाबदारी कार्यालय प्रमुखांवर निश्चित केली आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तसेच सभाग़्रहे, नाटयगृहे यांचा वापर मेळावे, सभा घेण्यास करता येणार नाही, असेही या आदेशात म्हटले आहे.