बिहारमध्ये शरद यादव राजदच्या चिन्हावर लढणार : महाआघाडीचे जागावाटप निश्‍चित

पाटणा -कॉंग्रेस, राजद आणि इतर पक्षांचा समावेश असलेल्या बिहारमधील महाआघाडीने शुक्रवारी लोकसभा निवडणुकीसाठी जागावाटप जाहीर केले. दरम्यान, महाआघाडीचा घटक असणाऱ्या लोकतांत्रिक जनता दलाचे (लोजद) नेते शरद यादव राजदच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत.

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. त्यातील निम्म्या जागा लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजद, तर 9 जागा कॉंग्रेस लढवणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमधून बाहेर पडलेला राष्ट्रीय लोक समता पक्ष (रालोसप) 5 तर विकासशील इन्सान पक्ष (व्हीआयपी) 3 जागा लढवेल.

माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चाच्या वाट्याला 3 जागा आल्या आहेत. दरम्यान, जेडीयूशी फारकत घेतल्यानंतर लोजदची स्थापना करणाऱ्या शरद यादव यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाआघाडीत जाणे पसंत केले. ते निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष राजदमध्ये विलीन करणार आहेत. महाआघाडीचा मुकाबला बिहारमधील सत्तारूढ एनडीएशी आहे. एनडीएमध्ये जेडीयू, भाजप, लोजप या पक्षांचा समावेश आहे. बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.