भोर (प्रतिनिधी) –भोर तालुक्यातील मानकरवाडीत एकजणाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. शहरी भागातून येणाऱ्यांचा लोंढा कमी होताना दिसत नाही. त्यामुळे मंगळवार (दि. 19) ते सोमवार (दि. 25) या कालावधीत गावी आलेल्या 6 जणांना करोनाची लागण झाली आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार यांनी दिली.
मुंबईवरुन आलेल्या एकाच कुटुंबातील चार जणांना करोनाची लागण झाली असतानाच त्यांच्या संपर्कात आलेल्या 6 पैकी एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विसगाव खोऱ्यातील बाजारवाडी जवळील मानकरवाडीत मुंबई वरुन आलेल्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे करोना बाधितांची संख्या सहा झाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे यांनी दिली. भोर तालुक्यात आजपर्यंत 22 हजारांपेक्षा अधिक लोक शहरी भागातून आले असून यापूर्वी करोना बाधित एक रुग्णही मुंबईवरुनच आलेला होता.
सोमवारी (दि.25) विसगाव खोऱ्यातील मानकरवाडीत पॉझिटिव्ह रुग्ण आढळ्याने प्रशासनाने रायरीप्रमाणेच बाजारवाडी गावच्या हद्दीपासून तीन किलोमीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून पाच किलोमीटर अंतरापर्यंत बफर झोन जाहीर केला आहे. पोलिसांनी बंदोस्तात बॅरिकेडस लाऊन परिसर सील केला असल्याचे तहसीलदार अजित पाटील यांनी सांगितले.