भोर -तालुक्यातील करोना तपासणीत अहवालात आज तीन जणांचे करोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात भोर शहर, सारोळा, आणि निदान सांगवी येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश असून तालुक्यातील बाधितांचा आकडा 226 वर पोहचला आहे.
यातील 153 जणांनी करोनावर मात केली असून, 63 करोना बाधितांवर भोर, नसरापूर व पुणे येथे उपचार सुरु असल्याची माहिती भोर तालुका पंचायत समितीचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत कऱ्हाळे व गट विकास अधिकारी विशाल तनपुरे यांनी दिली.
आज पर्यंत 808 संशयितांचे स्वॅब तपासले असल्याचेही या वेळी सांगण्यात आले. भोर तालुक्यातील करोना बाधितांचे संख्येत वाढ होत असताना दिसत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. प्रशासनाने सुचवलेल्या मार्गदर्शक नियमांचे नागरिकांनी पालन केल्यास तालुका करोनावर विजय मिळवू शकेल.
करोनाला तालुक्यातून हद्धपार करण्यासाठी भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव आणि तहसीलदार अजित पाटील यांच्या आदेशानुसार भोरचे प्रशासन रात्रंदिवस मेहनत घेऊन प्रयत्न करीत आहे; मात्र नागरिकांनी यासाठी सहकार्य करण्याची खरी गरज असल्याचे भोर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉं, विजयकुमार थोरात यांनी सांगीतले.