नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सध्या ‘भारत जोडो यात्रा’ सुरु आहे. त्यानुसार राहुल गांधी हे भारत दौरा करत आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्रप्रदेशातून ही यात्रा तेलंगणा राज्यात पोहचली आहे. मंगळवारी ही यात्रा हैदराबाद शहरात पोहचली होती. यात्रेला भरघोस प्रतिसाद मिळत असून राज्याचे माजी उर्जामंत्री नितीन राऊत सुद्धा तेलंगणातील यात्रेत सामील झाले होते. मात्र, यात्रेदरम्यान राऊत यांना गंभीर दुखापत झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
‘भारत जोडो यात्रे’त सामील झाल्यानंतर नितीन राऊत यांना पोलिसांकडूनच ही धक्काबुक्की करण्यात आली असल्याचे म्हटले जात आहे. धक्काबुक्कीत नितीन राऊत खाली पडले आणि उजव्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. तसेच, हात आणि पायालाही दुखापत झाल्याचे सांगितले जात आहे. नितीन राऊत यांना तत्काळ उपचारासाठी हैदराबादमधील वासवी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Congress leader and Maharashtra’s former Energy Minister Nitin Raut admitted to Vasavi Hospital in Hyderabad, Telangana when he fell down after allegedly being pushed by Police during Bharat Jodo Yatra. He sustained injuries in his right eye, hands and legs. pic.twitter.com/gk8uUZydVe
— ANI (@ANI) November 2, 2022
नितीन राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भेट घेतली आहे. तसेच, राजेश लिलोथिआ, इम्रान प्रतापगडी, कन्हैया कुमार आणि तेलंगणाच्या काँग्रेस नेत्यांनी राऊत यांची भेट घेत विचारपूस केली आहे.
दरम्यान, ‘भारत जोडो यात्रा’ ७ नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे पोहचणार आहे. महाराष्ट्रात ही यात्रा ११ दिवस चालणार आहे. महाराष्ट्रातील यात्रेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेही सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. यात्रेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे.