बारामती (प्रतिनिधी) – महायुतीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभा करण्याचे घोषित केले आहे. पहिल्या संभाव्य पंचवीस उमेदवारांची यादी रासपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.
यामध्ये पुणे जिल्ह्यातील बारामती आणि इंदापूर विधानसभा मतदारसंघाचा देखील समावेश आहे. बारामतीतून संदीप चोपडे आणि इंदापूरमधून तानाजी शिंगाडे यांची संभाव्य यादीमध्ये नावे आहेत.
दोन्हीही उमेदवार धनगर समाजाचे आहेत. महत्त्वाचे म्हणजे बारामती आणि इंदापूर विधानसभा संघामध्ये धनगर समाजाचे प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे बारामती आणि इंदापूर मतदारसंघामध्ये अजित पवार आणि शरद पवार यांच्यापुढे मोठी डोकेदुखी उभा राहणार आहे.
रासपकडून संदीप चोपडे यांचे नाव समोर येताच शरद पवार गटाचे संभाव्य बारामतीचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी धनगर समाजाच्या युवकांची बैठक बोलावल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अजित पवार यांच्या पक्षाकडून देखील बैठकीला बोलावल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.