बारामती : हायव्होल्टेज बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये सायंकाळी ५ पर्यंत ६२.३१ टक्के मतदान झाले, बारामती विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. त्यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोणता दादा बारामतीवर सत्ता गाजवणार, याचा फैसला दि. २३ नोव्हेंबर रोजी होईल. दरम्यान, नागरिक मतदान करण्यासाठी उशिरा आल्याने अनेक ठिकाणी उशिरापर्यंत बूथ सुरु होते.
बारामतीत सकाळी मतदानाला सुरुवात झाली. ज्येष्ठ मंडळी, महिला व नवमतदारांनी रांगा लावून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्राबाहेरील रांगांवरून नागरिकांमधील उत्साह दिसून आला. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेले नागरिक, महिला, खासगी क्षेत्रातील नोकरदारवर्गाने सकाळीच मतदानाचा हक्क बजावला.
मतदारांसाठी प्रत्येक केंद्रावर पाण्याची सोय, मंडप, ज्येष्ठांसाठी व्हिलचेअर सुविधांमुळे मतदारांना केंद्रावर कोणताही त्रास जाणवला नाही. मतदार केंद्रावर सज्ज पोलीस देखील मतदारांना मदत करीत होते. केंद्राबाहेर नावे शोधण्यासाठी पक्षाचे कार्यकर्ते सहकार्य करीत होते. कुणी ॲपवर नावे शोधून देत होते. कुणी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी मदत करीत होते.
दोन्ही पक्षाच्या वतीने मतदान केंद्रावर जय्यत तयारी केली होती. शहरातील मतदान केंद्राच्या परिसरात मंडप टाकून कार्यकर्ते परिसरातील मतदारांवर लक्ष ठेवून होते. मतदानासाठी मदत देखील करण्यात येत होती. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दोन्ही बाजुच्या नेतेमंडळींनी शेवटपर्यंत प्रयत्न केले.
शेवटपर्यंत मोबाइल खणाणले
मतदानाच्या दिवशी देखील मतदारांना या पक्षाचे चिन्ह आमके असून त्यावर आपले मतदान करा, या आशयाचे फोन येत होते. हा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, त्यावर त्यांची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. येणाऱ्या काळात त्या संदर्भाने प्रशासन काय कारवाई करणार हे स्पष्ट होईलच.
लक्ष्मीदर्शनानंतर मतांचा टक्का वाढला
लोकसभेला पैसे वाटल्याचा अनुभव असल्याने विधानसभा निवडणुकीला देखील पैसे मिळतील, या आशेने मतदार पैशांची वाट पाहत होते. मात्र, पैसे वाटप झाले नसल्याने शहरातील अनेक भागातील मतदार मतदान करण्यासाठी घराबाहेर पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळाले. दुपारी एक वाजेपर्यंत साधारण ३० टक्के मतदान झाले होते. ते दुपारी ३ ते पाच या वेळेत ६२ टाक्यांवर गेले.