औरंगाबाद – औरंगाबादमध्ये शुक्रवारी नवे 90 करोनाबाधित आढळले. त्यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) तब्बल 72 जवानांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील करोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगाव भागात एसआरपीएफच्या जवानांना तैनात करण्यात आले आहे. त्यातील 73 जवान गुरूवारी औरंगाबादमध्ये परतले.
परतल्यावर त्यांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 72 जवान करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यातील 5 जवानांना पुढील उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर इतर करोनाबाधित जवानांना एका शैक्षणिक संस्थेत उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या करोना उपचार केंद्रात हलवण्यात आले.
नवे बाधित आढळल्याने औरंगाबादमधील रुग्णांची संख्या आता 477 वर पोहचली आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे औरंगाबादकरांच्या चिंतेतही भर पडली आहे.