नवीन कायदा! ‘या’ राज्यात लग्नाअगोदरच द्यावी लागणार ‘ही’ माहिती

नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीचे सरकार असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात कायदा करण्यात आला आहे. राज्यपालांनी त्याला मंजूरी दिली आहे. भाजपचेच राज्य असलेल्या मध्य प्रदेशातही याबाबतच्या कायद्याची तयारी सुरू असताना आता आसाम सरकारही एक वेगळाच कायदा आणते आहे.

भाजपच्या आसाममधील सरकारच्या या नव्या कायद्यानुसार विवाह करू इच्छिणाऱ्या जोडप्याला एक महिना अगोदरच आपला धर्म आणि उत्पन्नाचे स्त्रोत याची माहिती द्यावी लागणार आहे. हा कायदा महिलांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचा दावा केला जातो आहे.

याबाबत बोलताना आसामचे मंत्री हिमंत विश्‍वशर्मा म्हणाले की, हा कायदा उत्तर प्रदेश अथवा मध्य प्रदेशने लव्ह जिहादच्या विरोधात केलेल्या कायद्यासारखा नसेल. मात्र त्यात काही बाबतींत साम्य असेल. केवळ लव्ह जिहादला विरोध म्हणून आमचा कायदा नसेल तर सगळ्याच धर्मांना तो लागू असणार आहे.

लग्नाच्या अगोदर आपल्या धर्माची आणि उत्पन्नाची माहिती द्यावी लागणार असल्यामुळे महिलांना याचा लाभ होईल. त्या सबल होतील. कारण बऱ्याचदा आपल्याच धर्माच्या व्यक्तीशी विवाह केल्यानंतर त्याचे कमाईचे साधन काय आणि त्याचा स्त्रोत काय, याची महिलांना माहिती नसते.

केवळ एवढेच नव्हे, तर नव्या कायद्यानुसार आपल्या कुटुंबाबाबत आणि शिक्षणाबाबतही माहिती द्यावी लागणार आहे. धर्म, कायमस्वरूपी पत्ता आणि व्यवसाय याची माहिती फॉर्ममध्ये भरून द्यावी लागेल. जर कोणी असे केले नाही तर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.