अरुणाचल प्रदेशात उपमुख्यमंत्र्यांचे घर पेटवले

इटानगर: अरुणाचल प्रदेशात सहा समुदायांना कायम निवासी दाखला देण्याच्या मागणीने आज हिंसक वळण घेतले. आंदोलकांनी रविवारी अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री चौना मेन यांच्या वैयक्तिक घराची आणि कार्यालयाची तोडफोड केली. आंदोलकांनी मेन यांच्या घराला आगही लावली, असे पोलिसांनी सांगितले.

शुक्रवारी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या एका आंदोलकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर प्रक्षुब्ध झालेल्या जमावाने रस्त्यांवरून धुडघूस घालायला सुरुवात केली. सार्वजनिक मालमत्ता आणि वाहनांनी मोडतोड करायला सुरुवात केली. इटानगरमधील उपमुख्यमंत्री चौना मेन यांचे निती विहार येथील खासगी घराची आंदोलकांनी तोडफोड केली आणि घराला आग लावली. घराच्या आवारात उभ्या करण्यात आलेल्या काही वाहनांनाही आंदोलकांनी आग लावली. आंदोलकांनी इटानगर पोलिस स्थानकाला आणि काही सार्वजनिक मालमत्तांनाही आग लावली, असे पोलिसांनी सांगितले.

आंदोलकांनी रस्ते बंद करून ते नहारलागून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जात असल्याचे बघून अनेक प्रवासी आणि काही रुग्णांनाही पोलिस स्टेशनमध्येच बसवून ठेवण्यात आले.
आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीमध्ये 35 जण जखमी झाले आहेत. इटानगरमध्ये शनिवारी लष्कराने ध्वजसंचलन केले. इटानगर आणि नहारलागून भागात बेमुदत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.