नागपूर – येथील न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांनी आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मतदान प्रतिज्ञापत्रामध्ये आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती जाहीर न केल्याप्रकरणी दिलासा देत आज झालेल्या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी दिली. याबाबत सविस्तर वृत्त असं की, २०१४ विधानसभा निवडणुकांचे प्रतिज्ञापत्र दाखल करताना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर असलेल्या गुन्ह्यांची माहिती दिली नव्हती. या प्रकरणी सतीश उके यांनी न्यालयामध्ये तक्रारी अर्ज दाखल केला असून फडणवीसांविरोधात फौजदारी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.
दरम्यान, आज नागपूर येथील न्यायालयीन दंडाधिकाऱ्यांनी या प्रकरणी सुनावणी करताना फडणवीस यांना आजच्या सुनावणीसाठी अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली. मात्र २४ जानेवारी रोजी होणाऱ्या सुनावणीवेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये फडणवीसांना सुनावणीसाठी हजर राहावे लागेल असे आदेश देखील न्यायालयाने दिले.
सदर प्रकरणी फडणवीसांना आतापर्यंत दोन वेळा न्यायालयाने अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली आहे. तत्पूर्वी काल, फडणवीस यांचे वकील उदय दाबले यांनी फडणवीस यांना न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीस अनुपस्थित राहण्याची परवानगी मिळावी अशी मागणी करताना ते राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका व अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त शेतकरी यांची भेट घेण्यामध्ये व्यस्त असल्याची माहिती न्यायालयाला दिली होती.